‘अनुपमा’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. ‘अनुपमा’ हा ‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेचा हिंदी रिमेक आहे. हिंदी मालिकेत ‘अनुपमा’ची मुख्य व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली गांगुली साकारत असून गेली १५ ते २० वर्ष रुपालीने छोट्या पडद्याद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे साहजिकच अभिनेत्रीची प्रसिद्धी व लोकप्रियता ही अधिकच आहे.
मात्र या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रसिद्धीमुळे सोशल मीडियाच्या या जमान्यात प्रत्येक लोकप्रिय व्यक्ती हे कॅमेऱ्यात टिपली जाते आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीवर चाहत्यांचे व नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष असते. अशातच अभिनेत्री रुपाली गांगुली नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली होती आणि यावेळी तिने केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर तिला नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सोशल मीडियावर रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर आपल्या पतीच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. विमानतळावर निरोप घेताना रुपाली आधी पतीच्या पायाला स्पर्श करते आणि नंतर तिचा मुलगाही वडिलांच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. तिच्या या कृतीचे तिच्या अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे, मात्र काहींना अभिनेत्रीची ही कृती आवडलेली नाही. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी रुपलीच्या या व्हायरल व्हिडीओवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली “खरं तर याची काही गरज नाही. नवऱ्याच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेण्याची काहीही गरज नाही. तू तुझ्या आई-वडिलांच्या पायांना स्पर्श कर, तुझ्या पतीच्या पायाला स्पर्श करण्याची काय गरज आहे?, नवऱ्याच्या आशीर्वादाने यश मिळते ही मानसिकता फेकून द्या, तुम्हाला हे सगळं मनापासून करायचं असेल तर त्यांनी घरीच करायला हवं होतं, इथे कॅमेरासमोर नाही”. अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अनुपमा या मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा खूपच मोठा आहे. तसेच रुपालीची लोकप्रियतादेखील तितकीच आहे. मालिकेत सध्या अनुज व अनुपमा हे एकमेकांपासून दूर आहेत आणि वनराज त्यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं दाखवण्यात आले आहे. मात्र काहींनी हा भाग आवडत नसल्याचे म्हटले आहे.