अभिनेता अजय देवगणचे आणि त्याच्या चित्रपटांचे लाखो चाहते दिवाने आहेत. अजय देवगणचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आता अजय देवगणचा ‘शैतान’ हा चित्रपट महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. अजय देवगण बऱ्याच काळानंतर भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अजय देवगण आपल्या कुटुंबासाठी लढताना दिसत आहे. (Shaitaan Twitter Review)
चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरु झाली होती, मात्र आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या हाती लागला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून थिएटरमधून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर ‘शैतान’ चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण खूप भोळा भक्त आहे. ‘शैतान’ चित्रपटाची कथा देखील वाईटावर चांगल्याच्या विजयावर आधारित आहे. अशा परिस्थितीत या शुभदिनी अभिनेत्याने आपला चित्रपट प्रेक्षकांच्या हातात दिला आहे, जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अजय देवगण आणि आर माधवन यांच्या ‘शैतान’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “प्रत्येकजण अजय देवगण व आर माधवनच्या अभिनयाची प्रशंसा करत आहे, ब्लॉकबस्टर म्हटलं जात आहे”, असं म्हटलं आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, “शैतान हा खूप चांगला चित्रपट आहे. जेव्हाही आर माधवन पडद्यावर येत होता, तेव्हा मला असे वाटत होते की कोणीतरी या शैतानला मारावे. तुम्ही हा चित्रपट नक्की पाहा”. एका नेटकऱ्याने ट्विट केले की, “दृश्यम २ हा चित्रपट संपूर्ण कॉपी पेस्ट होता, तोही एका क्लासिक चित्रपटाचा. मात्र शैतानमध्ये बदल आहेत. फ्रेम टू फ्रेम कॉपी करण्यापेक्षा काहीतरी सुधारणे केव्हाही चांगले”, असं म्हटलं आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “ही एका रात्रीची कथा आहे. मॅडीने अप्रतिम काम केले आहे. अजय देवगणचे भाव दिसत नाहीत, ज्योतिकाची भूमिका चांगली होती. पटकथा खूपच आकर्षक आहे”. ‘शैतान’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विकास बहल यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे.