गेल्या वर्षात ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्वच रेकॉर्डस मोडत एक नवीन विक्रम केला. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तब्बल ७५ कोटींपेक्षा जास्त कमाई करून मराठी कलाविश्वात नवीन रेकॉर्ड केला. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना या चित्रपटाची चांगलीच भुरळ पडली होती आणि आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे अनेक स्तरातून या चित्रपटाचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
अशातच बॉलिवूडमधील एका मोठ्या दिग्दर्शकाने या चित्रपटाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी चित्रपटाचे, कलाकारांचे व दिग्दर्शकाचे तोंडभरून कौतुक केले आहे आणि हे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’ फेम दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री. विवेक अग्नीहोत्री यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला असून यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी असं म्हटलं आहे की, “काल मी पहिल्यांदाच ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट ऑस्कर पात्र तर आहेच पण, बाईपणला राष्ट्रीय पुरस्कार तरी मिळालाच पाहिजे. गेल्या काही दिवसांत मी इतका सुंदर चित्रपट पाहिला नव्हता. सगळ्यांनी अतिशय दमदार काम केलेलं आहे.”

यापुढे त्यांनी दिग्दर्शक केदार शिंदेंचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “या सगळ्यात मोठं श्रेय आहे ते म्हणजे केदार शिंदे यांचं. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हा चित्रपट बनवला आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर त्याने बारकाईने काम केलं आहे. माझ्याकडे खरंच शब्द नाहीत.” तसेच यापुढे त्यांनी चित्रपटातील कलाकारांचे कौतुक करत असं म्हटलं आहे की “रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी तुम्ही कमाल आहात! तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि भविष्यात तुम्हाला आणखी यश मिळो एवढीच प्रार्थना! प्रेक्षकांना एकच सांगेन. हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन एकदा तरी हा चित्रपट पाहा आणि नंतर मला धन्यवाद म्हणा!”
दरम्यान, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर नुकताच हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे. ज्यांना चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता आला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.