मराठीतील देखणा, रुबाबदार अभिनेता म्हणून रवींद्र महाजनी यांची लोकप्रियता ही सर्वश्रुत होती. १९७५ ते १९९० हा काळ फक्त त्यांचाच होता. इतके यश मिळाल्यानंतरही रवींद्र हे एकेकाळी टॅक्सीही चालवायचे. रवींद्र महाजनींच्या पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ या पुस्तकात रवींद्र महाजनींनी एकेकाळी टॅक्सी चालवण्याबद्दल सांगितलं आहे. ‘चौथा अंक’ या पुस्तकात माधवी यांनी याबद्दल असं म्हटलं आहे की, “आमच्याकडे सासऱ्यांची कार होती आणि आईनंही मला एक कार भेट दिली होती. उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून रवी म्हणाला, आपण आपली कार टॅक्सी म्हणून चालवायला देऊ. त्याकाळी ड्रायव्हरने रोज मालकाला तीस रुपये द्यावेत व वरचे पैसे त्याचे; असा व्यवहार असायचा. सुरुवातीला ड्रायव्हरकडून रोज तीस रुपये मिळत असत. पण नंतर ते फसवू लागले. कधी म्हणायचे, पोलिसांनी अडवलं, कधी काही वेगळं कारण.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “ड्रायव्हर आपल्याला फसवतोय हे लक्षात आल्यावर रवी चिडला आणि त्यानं ड्रायव्हर ठेवायचं बंद केलं. पण मग यावर उपाय काय? कारण टॅक्सी चालवण्यासाठी ठराविक बॅच जवळ असणं गरजेचं होतं. आरटीओकडून तो मिळणं आवश्यक होतं. प्रयत्न करूनही तसा बॅच काही त्यांच्याकडून मिळेना. मग रवी रात्रीच्या वेळची गि-हाइकं घ्यायला लागला. पोलिस त्याला अडवायचे आणि त्याच्याकडूनही पैसे काढायचे. रात्रीच्या वेळी मुख्य गिऱ्हाईक म्हणजे अवेळी एअरपोर्टवरून घरी जाणारी-येणारी माणसं किंवा वेश्यांकडे गिऱ्हाईकांना नेणं-आणणं. रवीसारख्या देखण्या ड्रायव्हरवर तिथल्या बायका खुश असायच्या. त्याची गाडी दिसली की, ‘हीरो आया, हीरो आया’ म्हणत त्याला बघायला बायका जमा व्हायच्या.”
आणखी वाचा – आदित्य नारायणच्या ‘त्या’ कृतीमागील सत्य आलं समोर, मॅनेजरने खुलासा करत म्हटलं “सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण…”
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “रवीनं टॅक्सी चालवायला सुरुवात केली तेव्हा, लोक काय म्हणतील याची अर्थातच त्याला पर्वा नव्हती. मला मात्र ह. रा. महाजनींचा मुलगा, माझा नवरा टॅक्सी चालवून पैसे मिळवतो याबद्दल वाईट वाटत असे. तसेच हे नातेवाईकांत कळले तर? त्याच्या दिसण्यावरून तो टॅक्सी ड्रायव्हर वाटायचा नाही. मग तो त्या वेळात कायम एक मळलेला शर्ट घालत असे. सुधीर दळवी हा त्या वेळचा गाजलेला नट आणि रवीचा खास मित्र. हा टॅक्सी चालवायला निघाला, तेव्हा तोही त्याच्याजवळ बसला. वाटेत गिऱ्हाईक घेतले.”
यापुढे माधवी यांनी या पुस्तकात असं म्हटलं आहे की, “सुधीर आणि रवी ह्यांच्या सिनेजगताबद्दल अनेक गप्पा चालल्या होत्या. अखेरीस न राहवून टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने विचारले की, तुमच्यापैकी कोणी सिनेमात काम करते का? रवींद्र महाजनी हाच टॅक्सी ड्रायव्हर आहे हे कळल्यावर तो चकित झाला. लगेच दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी आली, ‘ह.रा. महाजनींचा मुलगा टॅक्सी ड्रायव्हर.’ त्यामुळे ही गोष्ट सर्वत्र झाली.”