रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच या चित्रपटाने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. ‘अॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. तर या चित्रपटातील रणबीर कपूर, बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. त्याचबरोबर रणबीरबरोबर मुख्य भूमिका साकारणारी रश्मिका मंदाणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Sandeep Reddy Vanga On Animal)
‘अॅनिमल’ चित्रपटात रश्मिकाऐवजी अभिनेत्री परिणीती चोप्राची ‘गीतांजली’च्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. परंतु, नंतर काही कारणास्तव परिणीतीला चित्रपटातून संदीप यांनी हाकलून दिल्याची बातमी समोर आली. यावर स्वतः संदीप रेड्डी वांगा यांनी खुलासा केला आहे. चित्रपटातली गीतांजली या भूमिकेसाठी परिणीती योग्य नसल्याने तिला काढण्यात आला आणि यामुळे ती नाराजही झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोमल नहाटा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केले आहे.
यावेळी मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की, “मी तिला (परिणीती) सांगितलं की, जमलं तर मला माफ कर. खरंतर ही माझीच चूक होती. काही पात्रं ही काही कलाकारांना शोभत नाहीत. माझा ऑडिशनवर विश्वास नाही, माझं मन जे सांगेल, त्यानुसार मी काम करतो. अगदी आधीपासूनच मला परिणीतीचं काम प्रचंड आवडतं, मला तिला ‘कबीर सिंग’मध्येही घ्यायचं होतं. पण तेव्हादेखील ते शक्य झालं नाही. मला तिच्याबरोबर काम करायची प्रचंड इच्छा आहे आणि तिलाही ते माहीत आहे.”
आणखी वाचा – ‘गुलाबाची कळी हळदीने माखली!’ गौतमीला लागली स्वानंदच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
यापुढे ते असं म्हणाले की, “माझ्यासाठी चित्रपटासमोर सगळं काही क्षुल्लक आहे. यावरून मी तिची माफीही मागितली. मी त्यावेळी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतल्याचं तिला स्पष्ट केलं होतं. तिला या गोष्टीचं वाईट वाटलं होतं, पण मी हे असं का करतो हे तिलादेखील चांगलंच ठाऊक होतं.” दरम्यान, ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून फक्त भारतात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.