मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनेच चोरी केली असल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुष्करलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे पैशांसह त्याच्या घरातील दागिनेही लंपास करण्यात आले. सोन्याचे दागिने चोरी करत त्या जागी खोटे दागिने ठेवण्यात आले. या केअर टेकर महिलेने तिच्या पतीसह ही चोरी केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्करच्या घरी झालेल्या चोरीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Pushkar Shrotri Home Robbery)
पुष्करच्या घरी केअर टेकर म्हणून काम करत असलेल्या महिलेचं नाव उषा गांगुर्डे तर तिच्या पतीचं नाव भानुदास आहे. पुष्करने घरकामासाठी तसेच त्याच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी केअर टेकर महिलेला कामावर ठेवलं होतं. उषा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत पुष्करच्या घरी काम करत होती. दरम्यान तिने घरामधून १ लाख २० हजार रुपये चोरी केले. पण पुष्करची पत्नी प्रांजलला केअर टेकरच्या वागणूकीमध्ये गडबड जाणवली.
२२ ऑक्टोबरला प्रांजलला उषावर संशय आला. संशय आल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिस चौकशीमध्ये केअर टेकर उषाने पैसे चोरी केल्याचे कबुल केलं. शिवाय ते पैसे उषाने पतीला दिले असल्याचं सांगितलं. उषाच्या पतीनेही तो गुन्हा कबुल केला. शिवाय २४ ऑक्टोबरला घरातील दागिनेही चोरीला गेले असल्याचं पुष्करच्या पत्नीला जाणवलं.
प्रांजलने कपाट उघडताच तिला तिच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये गडबड वाटली. ज्या दुकानामधून श्रोत्री कुटुंबियांनी सोन्याचे दागिने खरेदी केले होते तिथे ते कपाटातील दागिने घेऊन गेले. मात्र सगळे दागिने खोटे असल्याचं तेव्हा उघडकीस आलं. पुन्हा उषा यांची चौकशी करता खरे दागिने चोरी करुन त्याबदल्यात खोटे दागिने ठेवले असल्याचं कबुल केलं. या सगळ्या प्रकारानंतर २६ ऑक्टोबरला विलेपार्ले पोलिस ठाण्यामध्ये उषा व तिच्या पतीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.