मालिका असो वा एखादा कार्यक्रम एक ना एक दिवस प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्की. आजवर असे बरेच कार्यक्रम आहेत ज्यांनी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अनेक वर्ष सातत्याने सुरु असणारा कार्यक्रम, कार्यक्रमातील कलाकार यांचे प्रेक्षकांशी एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. हे असं सारं असलं तरी एक धक्का देणारी गोष्ट नुकतीच समोर आली आहे. ‘कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हे वाक्य आता कानावर पडणार नाही. कारण गेली दहा वर्षे अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आता बंद होणार आहे. (Chala Hawa Yeu Dya Show Update)
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. गेल्या काही वर्षात हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत खूपच मागे राहिला. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर वाहिनीच्या मतानुसार ‘लयभारी स्पेशल’ या कार्यक्रमाची योजना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. निलेश साबळे यांच्यावर होती. दरम्यान प्रदर्शित झालेला हा भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आणि अवघ्या १२ तासांत तयार झालेल्या या कार्यक्रमाला पुढे ‘चला हवा येऊ द्या’चे स्वतंत्र रूप मिळालं.
२०१४ साली सुरु झालेल्या या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची भुरळ हिंदी सिनेसृष्टीलाही पडली. मात्र कालांतराने या कार्यक्रमाची रंगत कमी होत गेली. आणि या कार्यक्रमाने अक्षरशः टीआरपीचा तळ गाठला. विविध उपक्रम राबवूनही कार्यक्रमाला हवं तितकं यश मिळालं नाही म्हणून वाहिनीच्या नव्या धोरणांमुळे हा कार्यक्रम अखेर बंद होणार असल्याचे समोर आलं. या कार्यक्रमाला आणि कार्यक्रमातील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे यांना प्रेक्षक मिस करणार एवढं नक्की.
तसेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत, निलेश साबळे यांनी लवकरचं नवं पर्व सुरु होणार असल्याचंही सांगितलं. निलेश साबळे म्हणाले की, “‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास आपण थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण, पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते.”