देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेल्या ६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपली छाप पाडली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने पटकावला. सलील कुलकर्णी यांनी आजवर सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. चित्रपट, मालिका, रिऍलिटी शोचे परीक्षक म्हणूनही त्यांनी बाजू सांभाळली आहे. (Saleel Kulkarni On His Divorce)
सलील कुलकर्णी यांनी दिलेली एक मुलाखत सध्या सर्वत्र व्हायरल झाली आहे. नुकतीच त्यांनी ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला मुलाखत दिली होती यावेळी सलील कुलकर्णी यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, तसेच अनेक विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सलील यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर केलेलं भाष्य सध्या चर्चेत आलं आहे. या मुलाखतीदरम्यान सलील यांनी त्यांच्या घटस्फोटावर भाष्य केलं. २०१३ साली सलील यांनी पत्नीपासून घटस्फोट घेऊन दोन मुलांना सांभाळायचं ठरवलं. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्यावर झालेली टीका याबद्दल ते स्पष्टचं बोलले आहेत.
याबद्दल बोलताना सलील म्हणाले, “जेव्हा मी वेगळं झालो त्यावेळी माझ्याबद्दल बरीच चर्चा झाली. आपल्या दोन मुलांना एकटा बाप वाढवणार आहे हे समजून घेण्याइतका समजूतदारपणा लोकांमध्ये का नसतो? मी अजिबात या गोष्टीचा त्रागा करत नाही आहे, पण त्या काळात बड्याबड्या गायक गायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना याविषयी गॉसिप करताना पाहिलं आहे. कित्येकांनी तर मला तोंडावर येऊन विचारलं आहे की, मी अमुक अमुक मुलीशी लग्न केलं आहे का?”
पुढे ते म्हणाले, “ही वृत्ती फार वाईट आहे, रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीच्या हातून महागडं घडयाळ चोरायची ही वृत्ती आहे. अशा अडचणीत सापडलेल्या माणसाला जर तुम्ही मदत करत नसाल तर किमान त्याला त्याचा लढा लढू द्यावा. लोक अशा प्रकारचं गॉसिप एन्जॉय करतात. लांबून खडे मारायचं काम कशाला करायचं? संदीप खरेंनी माझ्याबाबतीत एक जाहीर पोस्ट करत सांगितलं होतं की, तुम्ही त्याला कृपया त्रास देऊ नका, तो त्यांच्या मुलांचं प्रेमाने करतोय, अन् त्याने जर लग्न केलं तर तो तुम्हाला कळवेल. कित्येकदा हॉटेलमध्ये गेल्यावर हे गॉसिप माझ्या कानावर पडायचं.”