‘घागर घेऊन निघाली पाण्या गावळण’ या गाण्याने राशीक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड ही नुकतीच तिच्या आई होण्याच्या बातमीने चर्चेत आली आहे. १४ मे रोजी कार्तिकीने सोशल मीडियाद्वारे ती आई झाल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. कार्तिकीला मुलगा झाला असून सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत तिने तिच्या लाडक्या चिमुकल्या राजकुमाराचे स्वागत केले आहे.
कार्तिकीने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत “आम्ही आमच्या राजकुमाराचे स्वागत करत आहोत. हा एक नवीन सापडलेला खजिना आहे. आम्हाला आमचे नवीन प्रेम सापडले आहे. हा क्षण खरंच शब्दांत व्यक्त करता येणे शक्य नाही. मूल होण्याची ही भावना खूपच छान आहे” असं म्हणत तिचा आनंद व्यक्त केला.
कार्तिकी आई होणार असल्याचे कळताच तिच्या डोहाळ जेवणाचा जंगी कार्यक्रम पार पडला होता. पारंपरिक पद्धतीनं पण अगदी थाटात कार्तिकीचं डोहाळ जेवण करण्यात आलं होतं. तिच्या या डोहाळ जेवणाचे खास फोटो तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. अशातच आता या खास सोहळ्याचा एक व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये कार्तिकीच्या डोहाळ जेवणाची संपूर्ण झलक पाहायला मिळत असून या व्हिडीओमध्ये तिने तिच्या आई होण्याविषयीची भावना व्यक्त केली आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “आई होणे ही एक वेगळीच भावना असून आनंद व जबाबदारी ही वाटत आहे. आई होणे म्हणजे बाईचा दूसरा जन्म असतो असं म्हटलं जातं आणि आता मला ते अगदी खरंच वाटत आहे. तसेच लहानपणापासून मी अनेक रंगमंचावर गेले आहे पण डोहाळ जेवणाच्या रंगमंचावर येण्याचा आनंद वेगळा आहे”
यापुढे कार्तिकीच्या वडिलांनी “माझ्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने आनंद देणारा हा क्षण आहे’ असं म्हणत त्यांच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. तर कार्तिकी आई होणार असल्याचे कळताच तिच्या सासूलाही इतका आनंद झाला होता की त्या जागेवर आनंदाने उड्या मारू लागल्या होत्या असं कार्तिकीच्या नवऱ्याने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, प्रोमो समोर
या संपूर्ण व्हिडीओमध्ये कार्तिकीचा जंगी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळत असून यावेळी कार्तिकीने होणाऱ्या बाळासाठी गाणंही गायला होतं. होणाऱ्या बाळासाठी गायलेल्या खास गाण्याची झलकही या व्हिडीओच्या शेवटी पाहायला मिळत आहे. दरम्यान, कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे तुफान प्रतिसाद दिला आहे.