कलाकार मंडळी आणि ट्रोलिंग हे समीरकरण काही नवं नाही. प्रत्येक कलाकाराला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोलिंगला सामोरं हे जावंच लागतं. बरेचदा ही कलाकार मंडळी ट्रोलिंगकडे लक्ष देत नाहीत. तर काही वेळा हीच मंडळी प्रत्युत्तर देत नेटकऱ्यांना खडेबोल सुनावतात. अशातच एका मराठमोळ्या लोकप्रिय अभिनेत्रीने ट्रोलर्सच्या कमेंटवर सडेतोड उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. (Amruta Khanvilkar Answers To Trollers)
आजवर अमृताने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठी सिनेसृष्टीसह तिने बॉलिवूडमध्येही तिचं नाव कमावलं. अमृताचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट तर प्रचंड गाजला. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्याला तर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. अमृता तिच्या नृत्यामुळे आणि तिच्या फोटोशूटमुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरही बऱ्याच गोष्टी ती चाहत्यांसह शेअर करते. अमृताने काही दिवसांपूर्वीच स्वतःचं युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे.
अमृताने सुरु केलेल्या तिच्या युट्युब चॅनेलवर तिने ‘तिकीट टू महाराष्ट्र’ ही नवीन सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून ती राज्यातील नवनवीन ठिकाणांना भेट देताना दिसते. तसेच या माध्यमातून ती जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राची नव्याने ओळख पटवून देत आहे. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती ती या सीरिजमधून अधोरेखित करत आहे. दरम्यान अमृताने शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे या शहराची ओळखही सगळ्यांना व्हिडीओच्या माध्यमातून करुन दिली. पुण्याच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत तिला ट्रोल केलं. यावर प्रत्युत्तर करत अमृतानेही नेटकऱ्याला सुनावलं आहे.

एका नेटकऱ्याने अमृताच्या या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं आहे की, “काम मिळेना वाटतं आंटीला…”. या कमेंटवर प्रत्युत्तर देत अमृताने नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं. अमृता म्हणाली, “अहो आजोबा हे कामच आहे. हा प्रवासाशी संबंधित असणारा एक कार्यक्रम आहे. अच्छा, तुमच्या काळात हे युट्यूब वगैरे नसेल ना? म्हणून तुम्हाला या सोशल मीडियाच्या ताकदीची कल्पना नसेल. हरकत नाही.” अमृताने कमेंट करणाऱ्याची चांगलीच कान उघडणी केली.