Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींचं लग्न, त्यांचं खासगी आयुष्य, घटस्फोट याबाबत विशेष चर्चा रंगताना दिसते. अलिकडे कलाक्षेत्रातही घटस्फोटाचं प्रमाण वाढत असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व अभिनेत्री धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. युजवेंद्र व धनश्रीच्या नात्यामध्ये ठिणगी पडली असल्याचं याआधीही समोर आलं होतं. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता हे जगजाहिर होतं. आज अखेरीस अधिकृतरित्या युजवेंद्र व धनश्री वेगळे झाले आहेत. यादरम्यानचेच दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.
युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट
युजवेंद्र व धनश्रीने सहमताने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये या दोघांच्या घटस्फोटाची केस दाखल होती. आज अधिकृतरित्या दोघांना वेगळं राहण्याची मान्यता मिळाली आहे. दरम्यान घटस्फोटानंतर धनश्री किती एलिमनी घेणार याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. एकूण ४ कोटी ७५ लाख रुपये एलिमनीच्या स्वरुपात धनश्रीला मिळणार असल्याची शक्यता आहे. यामधील २ कोटी ३७ लाख आधीच युजवेंद्रने तिला दिले असल्याची चर्चा आहे. पण एलिमनी नक्की घेतली की नाही याबाबत युजवेंद्र व धनश्री यांच्याकडून कोणतीच अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
युजवेंद्र व धनश्रीचं का बिनसलं?
एका पॉडकास्टमध्ये युजवेंद्रने धनश्रीबरोबर कसं जुळलं? याबाबत सांगितलं होतं. धनश्री एक नृत्यांगणा आहे. त्यामुळे युजवेंद्रला धनश्रीकडून नृत्य शिकायचं होतं. याचदरम्यान तो धनश्रीशी बोलू लागला. बोलणं वाढल्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २२ डिसेंबर २०२०मध्ये गुडगाव येथे दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. बऱ्याचदा सोशल मीडियाद्वारे तसेच कॅमेऱ्यासमोर दोघांमधील घट्ट नातं अनुभवायला मिळालं. मात्र अखेरीस घडलं काही भलतंच.
लग्नाच्या दोन वर्षांनंतरच युजवेंद्र व धनश्रीमध्ये खटके उडू लागले. मात्र दोघांमध्ये नक्की काय घडलं?, नातं का बिनसलं? याचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही. शिवाय युजवेंद्र व धनश्री दोघांनीही याबाबत खुलेपणाने बोलणं टाळलं आहे. जून २०२२ पासूनच युजवेंद्र व धनश्री वेगवेगळे राहत असल्याचं त्यांनी न्यायालयात सांगितलं. शिवाय काही महिन्यांपूर्वी धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आडनावही काढलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघंही आता वेगळे झाले आहेत.