सुप्रसिद्ध अभिनेता एजाज खानचं ड्रग्ज संबंधित प्रकरण मध्यंतरी बरंच गाजलं. ‘बिग बॉस ७’मध्ये एजाज झळकला. त्यानंतर त्याची लोकप्रियता गगनाला भिडली. करिअर एका महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच त्याचं नशिब अगदी विरुद्ध दिशेला पलटलं. एका ड्रग्ज प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान एजाज मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद होता. एजाजला जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली त्याचदरम्यान शाहरुख खानचा लेक आर्यन खान व राज कुंद्राही आर्थर रोड जेलमध्ये कैद होते. दरम्यान एजाजचा या दोघांशीही जेलमध्ये संपर्क झाला. त्याच दिवसांबाबत बोलताना त्याने काही धक्कादायक दावे केले आहेत. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Ajaz Khan Drug Case)
“राज कुंद्राला जेलमध्ये मी सगळं पुरवलं”
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार एजाजने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “एका दुसऱ्या व्यक्तीची मदत घेत राज कुंद्रा मला जेलमध्ये माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. माझ्यासाठी त्या व्यक्तीकडे मॅसेजे पोहोचवायचा. पाणी, ब्रेड, बिस्कीट तो माझ्याकडे मागायचा. जेलच्या मुख्य अधिकाऱ्याने राजला पाणी देण्यासही नकार दिला होता. राजला बिस्लरी पाणी देण्याची परवानगी नव्हती”.
इतकंच नव्हे तर राजचा मध्यंतरी UT69 नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याचा जेलमधील प्रवास दाखवण्यात आला. मात्र चित्रपटात त्याने सगळं चुकीचं चित्र दाखवल्याचंही एजाजने सांगितलं. एजाज पुढे म्हणाला, “जेवढं राज त्याच्या पत्नीबरोबर राहिला नाही तेवढं तो जेलमध्ये माझ्याबरोबर राहिला. २४ तास मी त्याच्याबरोबर होतो. तिथे मी राजला खूप मदत केली. पण आता जेव्हा तो मोठ मोठ्या पार्ट्या ठेवतो तेव्हा मला बोलवत नाही. जेलमधील आयुष्य तो विसरला आहे”.
आणखी वाचा – नागपूर हिंसाचाराचा संबंध विकी कौशलच्या ‘छावा’शी जोडल्याने प्रेक्षक भडकले, म्हणाले, “आमचा हिरो…”
“आर्यन खान सिगरेट मागायचा”
आर्यन खानबद्दलही एजाजने अनेक धक्कादायक दावे केले. तो म्हणाला, “तिथे आर्यन खानही होता. शाहरुखच्या लेकाला मी पाणी, सिगारेट सगळं पुरवलं आहे. फक्त इतक्याच गोष्टी आपण एखाद्याला जेलमध्ये देऊ शकतो. तसेच गुंडांपासून वाचवू शकतो”. एजाजने जेलमधील वातावरण तसेच राज, आर्यनबाबत अगदी बेधडक वक्तव्य केलं आहे.