भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे लग्न समारंभ साजरा करतानाही अनेक विविधता दिसून येते. महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी अनेक प्रथा पाळल्या जातात. त्यात उखाणा हा सर्वात महत्त्वाचा असतो. लग्नाच्या वेळी नवरी किंवा नवरदेव लयबद्ध पद्धतीने आपल्या जोडीदाराचे नाव घेतात. त्यालाच उखाणा घेणे असं म्हणतात. अशाच एका हटके उखाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे आणि हा हटके उखाणा आहे सौरभ चौघुले व योगिता चव्हाण यांचा.
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले ही लोकप्रिय जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली. सोशल मीडियावरुन थेट लग्नाचे फोटो शेअर करत या दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच त्यांच्या उखाण्यांच्या व्हिडीओनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लग्नानंतर सौरभ व योगिता यांनी जेवणाच्या वेळी एकमेकांना घास भरवत खास उखाणे घेतले. यावेळी सौरभने योगितासाठी खास उखाणा घेत असं म्हटलं की, “एक होती चिऊ, एक होता काऊ, योगिताला घास भरवताना वाट कुणाची पाहू”. तर योगितानेही सौरभसाठी हटके उखाणा घेत असं म्हटलं की, “जागो जागी होई मला याचाच भास, सौरभचं नाव घेते भरवून भाताचा घास”. दोघांचे हे उखाणे उपस्थितांनाही चांगलेच आवडले असून त्यांनी या दोघांना टाळ्या वाजवत दाद दिली असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, योगिता व सौरभ यांच्या उखाण्यांचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये हा उखाणा आवडला असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.