गेले काही दिवस हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत लगीनघाई पहायला मिळत आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी आपापल्या जोडीदारांबरोबर लगीनगाठ बांधली. प्रसाद-अमृता यांनी पुण्यात शाहीपद्धतीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली. नुकतेच मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचंही अगदी साधेपणाने लग्न पार पडले. अशातच सुरुची-पियुष हे दोघेही विवाहबंधनात अडकले. पियुष रानडे व सुरुची अडारकर या जोडीने गुपचुप लग्न उरकल्याने त्यांच्या लग्नाच्या अनेक चर्चांना उधाण आले. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Piyush Ranade On Instagram)
पियुष-सुरुची यांच्या मेहंदी व हळदी समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच दोघांच्या रिसेप्शनच्या लूकमधील फोटोंनासुद्धा चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांसह अनेकांचे लक्ष वेधून घेतलं. सुरुची अडारकरचं हे पहिलंच लग्न आहे. तर पियुष हा तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. यावरून सोशल मीडियासह अनेक माध्यमातून त्याच्यावर ट्रोलिंग व टीका करण्यात आली. दोघांनी वैयक्तिकरित्या यावर भाष्यही केले आहे. अशातच या दोघांनी यावर पुन्हा एकदा पोस्ट करत त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
सुरुची -पियुष यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या पेटसह एक फोटो पोस्ट केला असून याखाली लिहिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टखाली त्यांनी असे म्हटले आहे की, “तुमचे हात आशीर्वाद घेण्यात इतके व्यस्त ठेवा की, तुमच्याकडे कोणत्याही नकारात्मकतेसाठी वेळ उरणार नाही.” दरम्यान, सुरुची-पियुष यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, पियुषवर नेटकऱ्यांकडून टीका व नकारात्मक कमेंट्स करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सगळ्यावर आता पियुषने या पोस्टद्वारे भाष्य केले आहे.
आणखी वाचा – “मी कधीच कोणाला कळलो नाही आणि…”, अशोक सराफांची मोठी खंत, म्हणाले, “सगळ्यांना हसवतो पण…”
दरम्यान, या पोस्टखाली फुलवा खामकरने “खूप सुंदर फोटो आहे. तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन. दोघांना छान आयुष्य लाभो” असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री अर्चना निपाणकरने “तुम्हा दोघांना खूप प्रेम” असं म्हणत कमेंट केली आहे. यांसह अनेक चाहत्यांनी या फोटोला लाईक्स व कमेंट्सद्वारे उत्तम प्रतिसाद दिला आहे.