बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान हिचा आज बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईमध्ये ताज एण्ड्स लँड या अलिशान हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. आयरा व नुपूर हे २०२०पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा तिच्या व नुपूरच्या नात्याविषयी नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. अशातच आता आमिर खानचा होणारा हा जावई नेमका कोण आहे आणि तो काय करतो. याची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Nupur Shikhare On Instagram)
नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. नुपूरने अभिनेत्री सुष्मिता सेनलाही फिटनेसचं प्रशिक्षणही दिलं आहे. सुष्मिताने नुपूरकडून दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. केवळ सुष्मिता सेनच नाही तर नुपूर हा आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईत आर.ए.पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली.
आणखी वाचा – डोक्यावर फेटा, एकमेकांना घास भरवला अन्…; लग्नापूर्वी आमिर खानच्या लेकीचं केळवण, पुरणपोळी-मोदकावर मारला ताव
नूपुर हा उत्तम फिटनेस प्रशिक्षक असण्याबरोबरच एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. तसेच तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. २०१४ मध्ये त्याने आयर्नमॅन ७०.३ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अल्टिमेट बीस्टमास्टर सीझन २ या स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. तसेच त्याने इतर काही स्पर्धांमध्येही भाग घेतल्याचे म्हटले जाते.
२०२० मध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या काळात नुपूरने तिला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गुपचूप साखरपुडा उरकत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता आणि अखेर आयरा-नूपुर हे दोघे आज एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत.