Nupur Shikhare and Ira Khan Marriage : कलाविश्वात सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. बॉलिवूड अभिनेता आमीर खानची लेक आयराही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोशल मीडियाद्वारे या विधींचे काही खास क्षण शेअर करण्यात आले आहेत.
नुकताच त्यांचा केळवणाचा सोहळा पार पडला. त्यांच्या या केळवणाचे खास फोटोही चाहत्यांना पाहायला मिळाले होते. आयरा-नूपुर यांच्या खास केळवणासाठी मोदक, लाडू, भरलं वांगं, पापड, लोणचं असा खास बेतही आखण्यात आला होता आणि केळीच्या पानावर हा पंचपक्वानाचा बेत करण्यात आल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळाले. अशातच आता त्यांचे काही आणखी फोटो समोर आले आहेत.
आयरा-नूपुर यांनी या खास कार्यक्रमासाठी मराठमोळा लुक केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी नूपुरने लाल रंगाचा कुर्ता, काळ्या रंगाचा धोतर, सोनेरी रंगाचा जॅकेट व त्यावर महाराष्ट्रीयन अंदाजातला खास फेटादेखील परिधान केला होता. तर आयराने लाल रंगाची साडी परिधान केली होती. एकमेकांना घास भरवत त्यांचा हा विधी पार पाडला. सोशल मीडियावर त्यांचे हे खास फोटो व्हायरल होत असून या फोटोंमधून त्यांचा खास रोमॅंटिक अंदाजही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आयरा-नूपुर यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला आणि आज ३ जानेवारी रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. वांद्रे येथील ताज लँड्स एंड या आलिशान हॉटेल हे दोघे शाही पध्दतीने विवाहबद्ध होणार आहेत. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे