Saif Ali Khan Attacked : बॉलिवूडमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरट्यांनी घुसून धारदार वस्तूने हल्ला केला. सैफ सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करीना कपूर तिची बहीण करिश्मा, सोनम कपूर आणि रिया कपूर यांच्याबरोबर मुलींची नाईट आऊट पार्टी करत होती. तिची सुमारे सात तास जुनी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट व्हायरल होत आहे. करीना कपूरने हल्ल्याच्या बातमीच्या सुमारे दोन तास आधी तिची बहीण करिश्मा कपूरची स्टोरी रिपोस्ट केली. या स्टोरीमध्ये त्या कोणाच्या तरी घरी असल्याचं पार्टी करत असल्याचं दिसतंय.
ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन देत असं म्हटलं की, “गर्ल्स नाईट आउट”. पोस्टमधील फोटोमध्ये खाद्यपदार्थ टेबलावर ठेवलेले पाहायला मिळत आहेत. मात्र हे कोणाचे घर आहे आणि सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना कुठे होती, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरी हल्ला झाला आहे. अज्ञात व्यक्तीने चाकूने अभिनेत्यावर वार केले आहेत.

लीलावती हॉस्पिटलच्या सीईओच्या निवेदनानुसार, अभिनेत्याला रात्री उशिरा ३-३:३० वाजता इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याला सहा जखमा झाल्या आहेत त्यातील दोन प्रहार खोल आहेत. त्यापैकी एक वार हा त्याच्या मणक्याच्या अगदी जवळ होता. त्यांचे किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. रुग्णालयाचे सीईओ म्हणाले, “दोन जखमा खोल आहेत. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत”.
मुंबई पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घालू लागला. जेव्हा अभिनेत्याने हस्तक्षेप करुन त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करत त्याला जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत”.