सध्या सर्वत्र सैफ अली खानच्या हल्ल्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. सैफच्या घरी पहाटेच्या सुमारास एका अद्यात व्यक्तीने घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर लगेचच त्याला मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले गेले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या. त्याच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी अपडेटदेखील दिल्या असून त्याच्या अडीच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबद्दलची सगळ्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अनेक जण सैफच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. तसेच इतकी कडक सुरक्षा असताना कोणी घरात कसे घुसले? असेदेखील प्रश्न विचारत आहेत. (Bollywood Actor Saif Ali Khan Attacked At Home)
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की एका अज्ञात व्यक्तीने रात्री सैफच्या घरी घुसून मोलकरणीबरोबर भांडण करु लागला. याचा आवाज सैफला येताच तो त्या ठिकाणी पोहोचला. मात्र सैफचे ऐकून न घेता त्या व्यक्तीने त्याच्यावरच हल्ला केला. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. याबद्दलच्या नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सैफच्या प्रकणातील पोस्टवर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #saifalikhan ट्रेंड होत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे चोरीचं प्रकरण आहे असं वाटत नाही नाही. कोणत्याही सेलिब्रिटीच्या घरी घुसणं इतकं सोपं नाही”. तसेच अजून एकाने लिहिले की, “अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. घुसखोर २४ तास सुरक्षा असणाऱ्या घरात कसा काय घुसू शकतो? सामान्य व्यक्तीच्या इमारतीबाहेरदेखील २४ तास सुरक्षा असते आणि प्रवेशावरदेखील खूप नियंत्रण असते. कोणताही चोर घरी घुसल्यावर अलार्म कसा नाही वाजला? संशयास्पद आहे”.
लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्मानी यांनी सांगितले की, ‘सैफ अली खानवर त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केले आणि त्यांना पहाटे ३.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले’. सध्या सैफवर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती केली आहे, अभिनेत्याच्या तब्येतीबाबत ते अपडेट देत राहतील असेही त्यांनी कळवले आहे.