‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. छोट्या पडद्यावरची कॉमेडी क्विन म्हणून विशाखाने ओळख मिळवली. मात्र जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून तिने एक्झिट घेतली तेव्हा मात्र सगळ्याच चाहत्यांचा हिरमोड झाला. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना अचंबित करणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार कायमचं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या विशाखा ‘शुभमंगल सावधान’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसतेय. शिवाय तीच ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक ही सुरु आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकणारी विशाखा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Vishakha Subhedar struggle story)
विशाखाने अभिनेत्री होण्याआधी बऱ्याच संकटांचा सामना केला आहे. म्हजेचज लोकल ट्रेनमध्ये ड्रेस विकणे ते आज नामांकित अभिनेत्रीच्या यादीत असणं असा खूप मोठा प्रवास विशाखाने पार केला आहे, नेमका काय आहे हा किस्सा जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा विशाखा सुभेदार या अभिनयक्षेत्रात येण्याआधी का विकायच्या ड्रेस (Vishakha Subhedar struggle story)
विशाखा सुभेदार यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती तेव्हा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की, मुंबई मध्ये राहणाऱ्या माणसांना करिअर पकडायच्या आधी लोकल पकडायला शिकावं लागतं. तू मात्र दोन्ही ही वेळेत पकडलस. याबद्दल बोलताना विशाखा यांनी सांगितलं की, अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्या एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या आणि आकाशवाणीमध्ये सुद्धा काम करत होत्या. त्याकाळी ट्रेन मध्ये प्रवास करत असताना त्या ड्रेस मटेरियल, नेलपेंट अशा महिलांच्या वस्तू होलसेल मध्ये घेऊन यायच्या आणि त्या त्यांच्या मैत्रींनीना वा ट्रेन मधल्या बायकांना विकायच्या.
परिस्थिती ही माणसाला बरंच काही शिकवून जाते, याचं हे हुबेहूब वर्णन आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अभिनयक्षेत्रात यश मिळवण्याआधी विशाखा यांनी बरंच स्ट्रगल केलं. ते या स्ट्रगल पिरियडमधून जातं असताना त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. अभिनयक्षेत्रात कुणीही वारसा नसताना त्यांनी आपल्या स्वबळाबर आणि कलेवरील प्रेमापोटी त्यांनी स्वतःच स्थान निर्माण केलं.