Vishakha Subhedar On Tushar Ghadigaonkar suicide : मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता तुषार घाडीगावकर याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या अचानक जाण्यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुषारने नैराश्यात येत हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजतंय. त्याच्यासह काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, त्याच्याकडे मुबलक काम असल्याचं म्हटलं. दरम्यान, मराठमोळ्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी तुषारच्या निधनानंतर कलाकारांच्या आर्थिक अडचणींवर भाष्य केलं आहे. त्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट एडिट करत माफी मागितली आणि म्हटले की, “मला जी माहिती मिळाली ती अर्थिक अडचण अशी होती पण ते कारण नाही”.
विशाखा यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, “‘रंगभूमी बळ देते असं म्हणता म्हणता वाईट बातमी, तुषार घाडीगांवकर या रंगकर्मीची! खरंतर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेजचे. अभिनयकडून अनेकदा त्याचं नाव ऐकलेले, भेटलेही होते, काम नव्हतं केलं पण भयानक वाईट घडले. हिच जी फेज येते, त्यावेळीस बोलायला हवं, मार्ग निघतो. (एडिट करतेय) मंडळी क्षमस्व. माहिती जी मला मिळाली ती अर्थिक अडचण अशी होती, पण ते कारण नाहीये हे आत्ताच एक निकटवर्तीय मित्राने सांगितले. त्या बद्दल मित्रा माफ कर मला. तू ज्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते वाईट झालं. सांगो वांगी जे कानावर पडलं त्यामुळे शेअर करावं वाटलं. पण तरीही माझा मुद्दा खोडावा असं वाटत नाही आहे”.
आणखी वाचा – गिरीजा ओकच्या पायाला मोठी दुखापत, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, उभं राहण्यासाठीही त्रास अन्…
कलाकारांच्या आर्थिक अडचणीवर भाष्य करत त्या म्हणाल्या, “कलाकारांना अर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी यासाठी फंड करावा असं खूप वाटतं. नंतर ते पैसे कमावून त्यांनी फेडावे. सोसायटीमधून कसं लोन घेता येतं, अगदी तसंच काहीसं कलाकार फंड करावा. त्याची काहीतरी सिस्टिम असावी. परतफेडीचे नियम नियोजन असावे. काहीतरी मार्ग असावा. रंगमंच कामगार संघटना आहे, ज्युनियर आर्टिस्टसाठींची संघटना आहे. संघटन फक्त त्यांच्या वरच्या फळीतल्या कलाकारांचं होत नाही. कारणं माहित नाही. मदत करतात ही काही मित्र-मैत्रिणी, पण नंतर तेही पाठ फिरवतात. त्याला दोषीही काही कलाकार आहेतच जे पैसे घेऊन गूल होतात, त्याच पैशांची दारु पितात. अनेकांनी अनुभवलं असेलच हे”.
आणखी वाचा – “माझ्याकडे येऊन खूप रडला पण…”, तुषार घाडीगांवकरच्या जवळच्या मित्राने सांगितलं मृत्यूमागील खरं कारण, म्हणाला…
शेवटी त्यांनी यावर मार्ग काढत म्हटलं की, “फार दुष्टचक्र आहे हे, पण तरीही काहीतरी मार्ग काढायला हवा! ताकद, बळ, द्यायला हवं. हातात कामं नसताना पोटाची खळगी, कामाची भूक आणि नकारत्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जातं. आमचं फिल्ड बेभरवशाच, त्यामुळे ही फेज प्रत्येकाला फेस करावीच लागते. साहित्य, नाट्य, संमेलनसाठी दिला जातो. त्यातुनच एक छोटासा भाग कलाकार निधी असं काही करता येईल का? किंवा जसं नाटक-सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं तस कलाकार जगावा (प्रामाणिकपणा पडताळून घ्यावा हवंतर) तर त्यासाठी वरदान/जीवदान, असं काही स्कीम करता येईल का? एक भाबडा विचार. त्यालाही अनेक फाटे फुटतीलच, पण आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल. पटतंय का कलाकार मित्र मैत्रिणींनो? ही वेळ कोणावरही येऊ शकते. पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया. स्वतःचा संसार चालवणं हे ज्याच त्याच कामं आहे पण टेकू तर देऊच शकतो. त्यासाठी काहीतरी स्कीम, प्रोव्हिजन बांधू शकतो का आपण?”.





