अभिनेता विक्रांत मेस्सी ‘१२वी फेल’ या चित्रपटाच्या यशानंतर चांगलाच चर्चेत आला. ‘१२वी फेल’च्या यशानंतर विक्रांतला अनेक चित्रपटांच्या ऑफरदेखील आल्या. अभिनयाची सुरुवात त्याने टेलिव्हिजनपासून केली होती. अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यादरम्याने त्याने आता धर्माबद्दल एक भाष्य केले आहे. विक्रांतच्या भावाने मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. विक्रांत अशा कुटुंबातून आहे जिथे जाती-धर्माला कोणतेही स्थान नाही. (Vikrant massey on his brother)
नुकतंच एका मुलाखतीदरम्याने विक्रांतने त्याचा प्रवास सांगितला आहे. ‘Unfiltered by Samdish’ या युट्यूब पॉडकास्टमध्ये तो सहभागी झाला होता. आपल्या अभिनयातील यशाबद्दल सांगताना कौटुंबिक पार्श्वभूमीही सांगितली. लहानपणापासून विक्रांतने धर्म आणि अध्यात्म याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. आपल्या मोठ्या भावाने वयाच्या १७ व्या वर्षी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे स्पष्ट केले.
मोठ्या भावाबद्दल बोलताना विक्रांत म्हणाला की, “माझ्या भावाचं नाव मोईन आणि माझं नाव विक्रांत हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. कुटुंबाच्या परवानगीने वयाच्या १७व्या वर्षी त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. माझी आई शीख आहे तर वडील ख्रिश्चन आहेत. ते नियमित चर्चमध्ये जातात. लहानपणापासूनच धर्म या गोष्टीवरुन होणारे वाद मी फार जवळून पाहिले आहेत”.
विक्रांत पुढे म्हणाला की, “माझे नातेवाईक माझ्या वडिलांना विचारायचे की तुम्ही तुमच्या मुलाला धर्म बदलण्याची परवानगी कशी दिली? त्यावर माझे वडील त्यांना म्हणायचे तो माझा मुलगा आहे आणि तो केवळ मला उत्तर द्यायला बांधील आहे. त्याने त्याच्या आयुष्यात काय करायचं हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. वडिलांच्या या बोलण्यामुळे माझेही विचार बदलले आणि मला असं वाटतं की धर्म हा मानवनिर्मितच आहे”.
विक्रांतने २०२२ मध्ये शीतल ठाकूरबरोबर लग्न केलं. नुकतेच दोघेही आई-वडील झाले आहेत. कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो आता एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त तो राजकुमार हिरानीच्या आगामी वेबसिरिजमध्ये दिसू शकतो अशी चर्चा आहे.