बॉलिवूडचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अन्नू कपूरने दोन लग्न केली आहेत. त्यांच्या लग्नाची कहाणी ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. दुस-या लग्नानंतर अन्नू कपूरने एका मुलीसह गुपचूप अफेअर सुरु ठेवले. अन्नू कपूरचे ज्या मुलीसह विवाहबाह्य संबंध होते ती मुलगी त्याची माजी पत्नी होती. त्यानंतर अन्नू कपूरने आपल्या माजी पत्नीशी दुसऱ्यांदा लग्न केलं. आज अन्नू कपूरचा ६८वा वाढदिवस आहे. (Annu Kapoor Marital Affair)
पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या अन्नू कपूर यांना सुरुवातीला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की, कधी चहा विकून त्यांना उदरनिर्वाह करावा लागला. तेव्हा अन्नू कपूर यांनी विचारही केला नव्हता की, ते एक दिवस इतके मोठे अभिनेते होतील आणि राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरतील. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी त्यांनी ‘एक रुका हुआ फैसला’ नाटकात ७० वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने अन्नू कपूरसाठी चित्रपट सृष्टीचा मार्ग खुला केला.
अन्नू कपूर यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा अन्नू कपूरच्या वैयक्तिक आयुष्याची जास्त चर्चा झाली. अन्नू कपूर यांनी पहिले लग्न अनुपमा नावाच्या मुलीशी केले, जी त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान होती. १९९२ मध्ये त्यांचे लग्न झाले होते, परंतु एका वर्षानंतर त्यांचा घटस्फोटही झाला. यानंतर, १९९५ मध्ये अन्नू कपूरने बंगाली अभिनेत्री अरुणिता मुखर्जीसह लग्न केले आणि ते एका मुलीचे वडीलही झाले. मात्र त्याच दरम्यान त्यांचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरु झालं. अन्नू कपूर सोडून त्या मुलीबद्दल इतर कोणालाही माहित नव्हतं. मात्र जेव्हा त्यांच्या अफेअरबद्दल सर्वांना कळले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अन्नू कपूरचे ज्या मुलीबरोबर अफेअर होते ती त्यांची माजी पत्नी अनुपमा होती.
अन्नू कपूरच्या या विश्वासघाताने त्यांची दुसरी पत्नी अरुणिता कोलमडली आणि तिने त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर अन्नू कपूर व अरुणिता यांचा २००५ मध्ये घटस्फोट झाला आणि अन्नू कपूर यांनी २००८ मध्ये पहिल्या पत्नीशी पुन्हा लग्न केले. लग्नानंतर ते व अनुपमा तीन मुलांचे पालक झाले. अन्नू कपूर यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्यापासून अंतर ठेवले होते. अन्नू कपूर त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून झालेल्या मुलांवर खूप प्रेम करतात आणि अनेकदा त्यांचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर करतात.