Chhaava Trailer Review : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत ‘छावा’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या ट्रेलरची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता ही उत्सुकता पूर्ण झाली असून चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर हवा केली. ज्याप्रमाणे चित्रपटाचे पोस्टर जबरदस्त होते त्याप्रमाणे चित्रपटाचा ट्रेलरही भारदस्त असल्याचं समोर आलं. नुकतेच या चित्रपटातील तीन मुख्य भूमिकांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना व संजय खन्ना यांचे पोस्टर होते. या तीनही पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा सुरु असताना चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
‘छावा’ च्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीला विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शंकराच्या पिंडीची पूजा करताना दिसत आहे. त्यानंतर शत्रुंशी लढताना विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. “हम शोर नही करते सिधा शिकार करते है”, “हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा” या भारदस्त संवादांनी अनेकांच्या अंगावर शहारे येत आहेत. शिवाय या ट्रेलरमधून राज्याभिषेक सोहळ्याचीही झलक पाहायला मिळत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नाही या ट्रेलरमधून भाव खाऊन गेला आहे. एकूणच छावाचा हा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.
हा ट्रेलर पाहून “आला रे आला शिवबा चा छावा आला”, “भाई विक्की कौशल आग लावलीस यार, नमः पार्वती पतये हर हर महादेव”, “कर्तृत्व एवढं महान असावं, नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”, “अंगावर काटा आला”, “शूर आबाचा शूर छावा”, “जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे”, “खरंच अप्रतिम ट्रेलर आहे. आता पूर्ण चित्रपट बघण्याची आतुरता आहे”, “मला गर्व वाटतोय. आज अंखड हिंदुस्थानला माझा संभुराजा कसा होता हे कळणार जय महाराष्ट्र”, अशा अनेक कमेंट करत ट्रेलरचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
विकी व्यतिरिक्त ‘छावा’मध्ये पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्याही भूमिका आहेत. रश्मिका या चित्रपटात राणी येसूबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर अक्षय या चित्रपटात क्रूर मुघल शासक औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज होत आहे.