Chhaava Trailer : सध्या सर्वत्र उत्सुकता आहे ती अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाची. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. खरंतर, हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वीच टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतेच या चित्रपटातील तीन मुख्य भूमिकांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना व संजय खन्ना यांचे पोस्टर होते. या तीनही पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अशातच आता या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. (Chhaava Trailer)
विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. यापूर्वी हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मुळे ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. टीझर आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता होती ती ट्रेलरची आणि अखेर आज ‘छावा’चा भव्य ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
‘छावा’ च्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीलं विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शंकराच्या पिंडीची पूजा करताना दिसत आहे. त्यानंतर शत्रुंशी लढताना विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. “हम शोर नही करते सिधा शिकार करते है”, “हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा” या आणि अशा अनेक संवादांनी अंगावर शहारे येत आहेत. शिवाय या ट्रेलरमधून राज्याभिषेक सोहळ्याचीही झलक पाहायला मिळत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नाही या ट्रेलरमधून भाव खाऊन गेला आहे. एकूणच छावाचा हा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. ‘छावा’चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.