संपूर्ण देशभरात काल होळीचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. लग्नानंतरच्या होळीबद्दल जोडप्यांमध्ये चांगलाच उत्साह असतो. होळी हा रंग, प्रेम व उत्साहाचा सण आहे. लग्नानंतर, नवविवाहित जोडप्यांना प्रथमच सर्व सण आणि विधी विशेष पद्धतीने साजरे करायला आवडतात. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असं म्हणत होळी या खास सणाचे सेलिब्रेशन केले जाते. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातनेही तिचा यंदाचा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आणि यावेळी तिने घेतलेल्या उखाण्यामुळे तिने उपस्थितांची मनंदेखील जिंकली असल्याचे पाहायला मिळाले.
अभिनेत्री वनिता खरात ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली आहे. तिच्या अनोख्या विनोदशैलीमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आपल्या विनोदीशैलीने कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री सोशल मीडियावरसुद्धा तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिचा उखण्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिचा नवरा सुमित लोंढे याने वनिताचा हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
वनिताने काल पार पडलेल्या होलिका दहनाच्या सणानिमित्त खास उखाणा घेतला. वनिता व सुमित यांचा गेल्यावर्षी मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. त्यामुळे कालच्या होळीच्या सणानिमित्त तिने सुमितसाठी खास उखाणा घेतला. हा खास उखाणा घेत ती असं म्हणाली की, “होळीवर माळ चढवली होती हिरव्या गुलाबी गोंड्यांची, सुमित रावांचं नाव घेते झाले मी सून लोंढ्यांची”
वनिताने घेतलेल्या या उखाण्यावर उपस्थित सर्व लोकांनी टाळ्या वाजवत तिच्या या उखाण्याला चांगलीच दाद दिली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सुमितने शेअर केलेल्या या व्हिडीओलाही अनेकांनी लाईकस व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्यांना होळीनिमित्त खास शुभेच्छाही दिल्या आहेत.