संपूर्ण देशात होळी हा सण अगदी उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. अशातच आज होळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे. होळीनिमित्त आज सर्वत्र होलिका दहनाच्या खास कार्यक्रमाबरोबरच पुरणपोळीचाही खास बेत असतो. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असं म्हणत आजच्या या खास सणाचे सेलिब्रेशन केले जाते.
ज्या जोडप्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं आहे त्यांच्यासाठी तर ही पहिली होळी खूपच खास असते आणि मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्यासाठी यंदाची होळी ही खूपच खास आहे. अशा अनेक जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता सौरभ चौघुले व अभिनेत्री योगिता चव्हाण. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ व योगिता ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली.
मालिका संपल्यानंतरही ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. अखेर आता या जोडीने लग्न केले असून दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या दोघांच्या ‘तू माझी पुरणपोळी रे’ या गाण्यामुळे सोशल मीडियावर ही जोडी खूपच चर्चेत आहे. अशातच आज होळीनिमित्त सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने बायकोचे म्हणजेच योगिताचे कौतुक केले आहे.
सौरभने पुरणपोळीचा एक खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला असून या पोस्टमध्ये त्याने “आज पुरणपोळीचा खास बेत होता. पण खायच्या उत्सुकतेमुळे फोटो काढायचा राहून गेला” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने योगिताच्या हातची पहिली पुरणपोळी असल्याचेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ व योगिता ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. त्यानंतर ही जोडी पुन्हा केव्हा पडद्यावर झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. ‘तू माझी पुरणपोळी रे’ या गाण्यातून या जोडीला एकत्र पाहणं रंजक ठरत असून चाहतेही दोघांवर भरभरुन प्रेम करत आहेत.