१०० वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दणक्यात सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. पुणे येथे सुरु झालेलं हे नाट्यसंमेलन पुढे पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सोलापूर, बीड, नागपूर, लातूर, मुंबई व शेवटी रत्नागिरी अशा ठिकठिकाणी भरणार आहे. या नाट्य संमेलनादरम्यान विविधांगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक कलाकार मंडळी या नाट्य संमेलनात सहभागी झालेलेही पाहायला मिळत आहेत. पारंपरिक अंदाजात आलेले हे कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत. (Vandana Gupte On Natyasanmelan)
अशातच एका नाट्य संमेलनाला घेऊन एका मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. अभिनेत्री वंदना गुप्तेदेखील यानाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. मात्र त्यांना ठिकाणाचा पत्ता न मिळाल्याने त्या नाराज झाल्या आणि पुन्हा मुंबईला परतल्या. नाट्यसंमेलनाचा पत्ता न सापडल्याने वंदना गुप्ते नाराज झाल्या आहेत. यामुळे त्यांना आल्या पावली मुंबईला परत जावं लागलं असल्याचं या व्हिडीओमधून समोर आलं आहे. सकाळ मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र नेटकऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओद्वारे वंदना गुप्ते म्हणत आहेत की, “ओके दादा मी परत मुंबईला चालली आहे. नुसतीच गोल गोल फिरत आहे. मला एकही, कुठलाही सभामंडप दिसलं नाही, सापडलं नाही. रामकृष्ण मोरे सभागृह माहिती आहे म्हणून. पण मला काही आता इकडे तिकडे कुठे जायचं नाही. मी आले होते नटून थटून पण मला काही कार्यक्रमाला वेळेत पोहोचता आलं नाही तर मी जाते आता परत” असं म्हणत नाट्यसंमेलनाचा पत्ता न सापडल्याचं त्यांनी व्हिडीओमधून सांगितलं आहे.
‘सकाळ मीडिया’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “अंगणवाडीचा पोरगा सुद्धा गुगल मॅप वापरून योग्य जागेवर पोहोचतो” असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, “आमच्या एरियामध्ये होत आहे हा कार्यक्रम. अगदी सोप्पा पत्ता आहे. बाकी कलाकारांना कसा काय सापडला मग? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाल्या की रामकृष्ण मोरे सभागृह माहिती आहे. तर तिथे आल्यावर नियोजकाना का फोन केला नाही?” अशी कमेंट करत त्यांना प्रश्न विचारला आहे.