२०२३ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी खूप खास होतं. एकामागोमाग एक हिट चित्रपट देत बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळचं घातला. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने २०२३च्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करत बक्कळ कमाई केली. या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. चित्रपटामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांना विशेष लोकप्रियता मिळाली. सर्वच स्तरातून केदार शिंदे यांचं भरभरून कौतुक होताना पाहायला मिळालं. (Bela Shinde On Kedar Shinde)
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्गंबाई अरेच्चा २’ या चित्रपटाच्या अपयशानंतर सात वर्ष केदार शिंदे सिनेसृष्टीत दिसले नाहीत. त्यानंतर २०२३ मध्ये दोन मोठे चित्रपट घेऊन येत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. २०२३ मध्ये केदार शिंदे यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोन्ही चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर केदार शिंदे यांच्या कामगिरीच सर्वत्र कौतुक झालं.
अशातच आता केदार शिंदे यांच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. यंदाच्या ‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’मध्ये केदार शिंदे यांच्याविषयी लिहिण्यात आलं आहे. अॅटली, करण जोहर, सिद्धार्थ आनंद, विधू विनोद चोप्रासह मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदेही या मॅगझीनमध्ये झळकले आहेत. हाच क्षण पाहून केदार यांच्या पत्नी बेला शिंदे भारावून गेल्या. याबाबतची एक खास पोस्ट त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर देखील केली आहे.
बेला शिंदे यांनी सोशल मीडियावर फोर्ब्स इंडिया मॅगझिनचा फोटो शेअर करत, “काल काही ठाऊक नसताना ही माझ्या आयुष्यात घटना घडली. Forbes India magazine मध्ये केदार विषयी लिहून आलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कुठल्यातरी अनोळखी व्यक्तींनी ही घेतलेली दखल. थोरामोठ्यांच्या मांदियाळीत त्याला पाहीलं. डोळे पाणावले. २७ वर्षे त्याची धडपड पाहत आहे. हे सगळं घडलं ते तुम्हा रसिकांच्या प्रेमाने. स्वामी कृपेने त्याची घोडदौड अशीच सुरु राहो. त्यावर तुम्ही सगळ्यांचं प्रेम कायम राहो. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्री स्वामी समर्थ” असं म्हणत त्यांनी नवऱ्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे.