नात्यांच्या जगात अतिशय प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं नातं असत ते बाप लेकीचं. एखादया मुलीच्या तिच्या वडिलांसाठी असलेलं प्रेम, आदर या भावना इतर नात्यांपेक्षा नेहमीच वेगळ्या ठरतात. सामान्य माणूस असो वा पडद्यावर झळकणारा प्रसिद्ध कलाकार सर्वांना या भावनेतून जावं लागत. अशीच प्रेमळ भावना अनुभवण्याचा योग आला होता अभिनेता उपेंद्र लिमयेसह. अभिनेते उपेंद्र लिमये यांची मुलगी भैरवीचा हिच्या विवाह सोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. (Upendra Limaye On Social Media)
विवाह सोहळ्यासाठी भैरवीचा सजलेला लुक पाहून भावनिक झालेल्या उपेंद्रचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. भैरवीचा सजलेला लुक पाहून ‘काजळाचा तीट लावा’ असं म्हणत लेकीच्या लुकच कौतुक करत उपेंद्र भावुक झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र उपेंद्र लिमये हे स्वतः सोशल मीडियापासून दूर आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लेकीच्या लग्नसोहळ्यातील या व्हिडीओबाबत बोलताना उपेंद्र लिमये म्हणाले की, “माझ्या मुलीची मेकअप आर्टिस्ट होती तिने स्वतःसाठी म्हणून तो व्हिडीओ केला. त्या व्हिडीओला अगदी मिलियन व्ह्युज मिळाले. आणि हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरला. मी आमच्या घरातल्या मंडळींना कठोर शब्दांत सांगितलं होतं की, हा अत्यंत घरगुती व व्यक्तिगत तुमच्या जवळच्या लोकांचा सोहळा आहे, त्यामुळे त्याचा असा बाजार मांडलेला मला आवडणार नाही. मी स्वतः आतापर्यंत असं करत नाही” असं त्यांनी म्हटलं.
यापुढे सोशल मीडियाबद्दल बोलताना ते म्हणाले, “आता तर कसं आहे की, तुम्ही स्कॅनरखालीच आहात. तुम्ही घराबाहेर जेव्हा पडता, तेव्हा बोलणं, चालणं सगळंच कॅमेऱ्यात कैद होतं. त्याला आपण काही करु शकत नाही. पण आपण स्वतःहून काही करुया नको असं माझं म्हणणं होतं. त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओविषयी मला राग नाही. पण ते प्रचंड व्हायरल झाले आणि रस्त्यात भेटेल तो मला अभिनंदन करत सुटले होते. तेव्हा मला कळलं नाही की कसलं अभिनंदन, त्यानंतर त्या व्हायरल व्हिडीओने हे सगळं घडवून आणलं हे मला कळलं. यावरून एक सांगेन की, सोशल मीडियाची ताकद जबरदस्त आहे आणि ही ताकद सकारात्मक वापरली तर अधिक चांगलं आहे. ताकद जास्त असल्यामुळे ती ताकद अधिक वाईट गोष्टीही घडवू शकते” असं त्यांनी म्हटलं.