मराठी मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. आजवर त्यांनी बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. ज्यात विनोदी, गंभीर, नकारात्मक भूमिकांचा सामावेश होतो. सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सुप्रिया यांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्या सोशल मीडियावर कामाव्यतिरीक्त वैयक्तिक आयुष्यातील विविध क्षणांबाबत फोटोज् व व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकतीच त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणीबाबत लिहीलं आहे. (supriya pathare share a emotional post)
काही दिवासांपूर्वी सुप्रिया यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आईचं निधन झालं असल्याची बातमी त्यांनी स्वतःच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली. या वेळी त्यांनी त्यांच्या आईचा जुना फोटो शेअर केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट लिहीली आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोत सुप्रिया त्यांच्या आईसह दिसत आहेत. तर त्याचबरोबर ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील सहकलाकारही त्यांच्याबरोबर दिसत आहेत.
हा फोटो शेअर करत त्या लिहीतात, “आज आईला जाऊन ४ दिवस झाले, मे महिन्यात ‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील माझ्या सह कलाकारांना घेऊन मी गावी गेले होते. तेव्हा ती खूप खुश झाली होती. गणपतीला माझ्या घरी २ दिवस राहिली, सगळ्यांना भेटली. तिच्या जाण्याची बातमी सगळ्यांनाच धक्का देणारी होती. त्या धक्क्यातून मीच अजून सावरले नाही आहे. आई तुझ्या शारीरिक वेदना मी समझु शकते. जिथे आहेस तिथे सुखात राहा”, असं लिहीत त्यांनी त्यांच्या आईच्या शेवटच्या क्षणांबाबत त्यांच्या आठवणी सांगितल्या. सुप्रिया अजूनही त्यांच्या आईच्या धक्क्यातून सावरल्या नसल्याचं पोस्टवरून जाणवत आहे.
या फोटोवर बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या दुःखात सहभाग दर्शवला आहे. एका नेटकऱ्याने, ‘आईना भावपूर्ण श्रद्धांजली’, म्हणत कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘ओम शांती’ असं लिहीत त्यांच्या दुःखात सामील झाले आहेत. आजवर सुप्रिया यांच्या आईने त्यांना नेहमी पाठिंबा दिला. प्रत्येक कामामध्ये, करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर हातभार लावला. रस्त्यावर बसून अंडी, चणे विकण्याचं कामंही त्यांनी व त्यांच्या आईने केलं आहे.