स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. याच मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुप्रिया यांच्या आईचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आईचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी फक्त “आई” असं म्हटलं आहे. सुप्रिया यांच्या आई गेले काही दिवस आजारी होत्या. ठाणे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुप्रिया यांच्या बहिणीनेही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Supriya Pathare Mother Death)
सुप्रिया यांची बहीण अर्चना नेवरेकरही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अर्चना यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून सुप्रिया यांच्या आईचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालं असल्याचं दिसत आहे. अर्चना म्हणाल्या, “आज माझी मामी गेली. ती आज आईला भेटेल”. अर्चना यांची पोस्ट दोन दिवसांपूर्वीची आहे. सोशल मीडियाद्वारे सुप्रिया यांच्या आईला कलाकारांसह चाहते मंडळी श्रद्धांजली वाहत आहेत.
सुप्रिया यांनी सुलेखा तळवलकर यांच्या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आईबाबत भाष्य केलं होतं. खूप कष्टाने आईने सुप्रिया व त्यांच्या भावंडांना वाढवलं. इतकंच नव्हे तर सुप्रिया स्वतः आईसह घरकामं करत होत्या. लोकांच्या घरातील धुणी-भांडी त्या आईसह करायच्या. सुप्रिया शाळेत गेल्यानंतर ते काम आई करायची. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या सुप्रिया यांनी अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या ताफ्यात आणखी एका आलिशान कारची भर, कारची किंमत आहे इतकी
सुप्रिया यांच्या आईने मात्र त्यांना कायम पाठिंबा दिला. प्रत्येक कामामध्ये, करिअरमध्ये त्यांना हातभार लावला. रस्त्यावर बसून अंडी, चणे विकण्याचं कामंही त्यांची आई करायची. त्याचबरोबरीने सुप्रिया स्वतःही हे काम करत होत्या. चाळीमधून त्यांच्या आईचा प्रवास सुरु झाला. सुप्रिया यांनी मात्र अभिनयक्षेत्रात स्वतःचं नाव कमावत आईला शेवटपर्यंत सुखी ठेवलं.