स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेचे कथानक हे एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित होते. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. अप्पूचा अल्लडपणा व शशांकचा समजूतदारपणा यामुळे ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. अप्पू-शशांक व्यतिरिक्त मालिकेतील इतर कलाकारांनीदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली.
मालिकेतील अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. आदर्श सून कशी असावी याच उत्तम उदाहरण तिने प्रेक्षकांसमोर आणलं. दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांबरोबर सोशल मीडियाद्वारे काही भावुक क्षण शेअर केले आहेत.
अशातच मालिकेतील अप्पू अर्थात ज्ञानदाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती वाड्यातील रांगोळीला नमस्कार करत आहे आणि भावुकही झाली आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण” असं कॅप्शन दिलं आहे. तसंच यापुढे “मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अप्पू निरोप घेत आहे” असं देखील म्हटलं आहे.
दरम्यान या व्हिडीओखाली ज्ञानदाच्या अनेक चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. अभिनेते अभिजीत खांडकेकर व उदय टीकेकर यांनी “आमचं मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद” म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर अभिनेत्री सारिका नवाथे, गौरी कुलकर्णी यांनी “तू खूप छान काम केलंस” अशा कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर मालिकेच्या व अप्पूच्या चाहत्यांनीदेखील “आम्ही तुला खूप मिस करू” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.