‘का रे दुरावा’ ही मराठी मालिका विश्वातली लोकप्रिय मालिकांपैकी एक मलिका आहे. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतील जय-अदिती या पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेच, पण या मालिकेतील जुई ही भूमिकादेखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. या मालिकेत जुई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना निपाणकर. ‘का रे दुरावा’ मालिकेद्वारे अर्चनाने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते आणि का रे दुरावा या मालिकेमुळे तसंच तिच्या या मालिकेतील जुई या भूमिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली.
या मालिकेनंतर तिने ‘100 डेज’ या मालिकेत काम केले. यात तिने आदिनाथ व तेजस्विनी पंडीतबरोबर अभिनय केला होता. यानंतर तिने ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेमध्येही काम केले होते. ज्यामध्ये तिने दीपिकाची भूमिका केली होती. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेमध्ये ती नकारात्मक भूमिकेमध्ये झळकळी आहे. या मालिकेतून अर्चना अधिकच लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर लोकप्रिय भूमिका साकारल्यानंतर तिने बॉलिवूड विश्वातदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. अर्चनाने आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात क्रिती सेनॉनसह पद्मिनी कोल्हापुरे या अभिनेत्रींबरोबर स्क्रीन शेअर केली होती. ‘पानिपत’ चित्रपटात तिने राघोबादादा पेशवे यांची पत्नी आनंदीबाई यांची भूमिका साकारली होती. अर्चनाच्या या भूमिकेचीही जोरदार चर्चा रंगली.
अभिनयाबरोबर अर्चनाने तिची संगीताची आवडदेखील जोपासली. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अर्चनाने या शोमध्ये गाणी गात चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते. ही अभिनेत्री काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत तिने पूजा हे पात्र साकारले होते. मात्र कालांतराने या मालिकेतून निरोप घेतला.
टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यासह बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, तिच्या अनेक फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो. अशातच अनेक मालिका व चित्रपटांत काम केल्यानंतर आता ही अभिनेत्री कोणत्या नवीन भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार यांची तिचे अनेक चाहते मंडळी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.