कलाकार हा नेहमीच कौतुकाचा भुकेला असतो. एखाद्या कलाकाराला चाहत्याने वा प्रेक्षकाने केलेले कौतुक हे नेहमीच आवडत असतं आणि प्रत्येक कलाकाराला चाहत्यांच्या कौतुकाचे असे अनुभव हे पदोपदी येत असतात. असाच एक खास अनुभव अभिनेत्री जुई गडकरीला आला असून तिने हा अनुभव ‘इट्स मज्जा’च्या प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत जुईने तिची ही खास Fan Moment चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे जुई चांगलीच लोकप्रिय झाली आहे. जुई गडकरी हिने आजवर केलेल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जुई आतापर्यंत ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे…’ अशा मालिकांमध्ये झळकली आहे. मात्र ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती चांगलीच लोकप्रिय झाली. त्यानंतर आता ‘ठरलं तर मग’ ही मालिका व या मालिकेतील तिची भूमिकादेखील चांगलीच गाजत आहे.
याच मालिकेच्या निमित्ताने सायली-अर्जुन नुकतेच माथेरान इथे शूटिंगसाठी गेले होते. यावेळी एका आजीने तिचे कौतुक करत तिचा गालगुच्चा घेतला आणि हीच गोड आठवण जुईने ‘इट्स मज्जा’बरोबर शेअर केली आहे. यावेळी जुईला माथेरानमधील आठवणीत राहणारा प्रसंग विचारण्यात आला. तेव्हा “आठवणीत राहणारा असा एक नाही तर असे अनेक किस्से आहेत” असं जुईने म्हटलं.
याचनिमित्ताने एक खास किस्सा सांगताना जुई असं म्हणाली की, “एक आजी माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मला इतकं चिवळलं अन् गालगुच्चे घेतले की, त्यामुळे माझा पूर्ण मेकअपच निघाला. आम्ही एका दुकानात गेलो होतो तेव्हा त्या मला बघून भारावल्या. त्यांना काय करु आणि काय नको असं झालं तेव्हा त्यांनी मला अक्षरश: चिवळून काढलं आणि त्यात माझा मेकअप निघाला. पण मला वाटतं हीच माझ्या कामाची खरी पोचपावती आहे.”