Tharala Tar Mag TRP : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांच्या यादीत एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे ठरलं तर मग. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका आहे. ही मालिका सुरु झाली तेव्हापासून टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. मालिकेच्या उत्तम व रंजक कथानकाने आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मेहनतीमुळे आजवर या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत तिचा प्रथम क्रमांक टिकवून ठेवला आहे. मालिकेत जुई गडकरी व अमित भानुशाली मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर इतर पात्रही त्यांच्या भूमिका उत्तमरीत्या वठवताना दिसत आहेत.
नुकतीच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ‘द क्राफ्ट’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये, मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी बोलताना जुई गडकरी म्हणाली की, “प्रत्येक प्रोजेक्ट आपलं नशिब घेऊन येतो. बऱ्याच गोष्टी या प्रोजेक्टबद्दलही बदलल्या. जी माणसं इथे राहिली, त्यांच्यातील पॉझिटिव्ह वाइब्स इतक्या जुळतात की, त्या द्विगुणीत होतात. माझा यावर विश्वास आहे की, आपण ५०० टक्के काम करत असू तर देवालाही तो नंबर आपल्याला द्यावाच लागतो. माझा यावर प्रचंड विश्वास आहे. दर गुरुवारी जेव्हा मालिकांचे रेटिंग येते तेव्हा मला त्याबाबतीत ताण येतो. मालिका सध्या अव्वल स्थानी आहे, म्हणून सगळे स्थिरावले आहेत, असं होतं नाही”.
पुढे ती म्हणाली, “आम्ही सगळेजण तेवढ्यात मेहनतीने काम करतो, जे आहे त्यापेक्षा वर जायचं आहे आणि ते टिकवायचं आहे. माझ्यासाठी या प्रोजेक्टवर काम करणं महत्त्वाचं होतं, कारण काही वैयक्तिक कारणामुळे तीन वर्षांनी मी डेलिसोप करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मी अधिक मेहनतीने काम केलं आणि देवानेही साथ दिली. आम्हाला रोज काम करताना जाणवतं की कोणाचा तरी पाठिंबा आहे आणि तो देवाचा पाठिंबा आहे, हे मी खरं सांगते. आमच्या सेटवर खूप आनंदाने आम्ही काम करतो, खूप सकारात्मकता असते. मेहनत प्रत्येक माणूस करतो, पण आमच्या मेहनतीला देवाचा पाठिंबा आहे, यावर माझा विश्वास आहे”.
आणखी वाचा – चर्चा खोट्याच; लेकीच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चनही होता हजर, ऐश्वर्या रायसह पार्टी, व्हिडीओ व्हायरल
जुईच्या या बोलण्याला पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योति चांदेकर यांच्यासह सर्वांनीच दुजोरा दिला. ‘ठरलं तर मग’च्या सेटवर प्रचंड सकारात्मकता असते, या जुई व सचिन यांच्या वक्तव्याला अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनीही दुजोरा दिला. शिल्पा म्हणाल्या की, “या मालिकेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती कामाचा आनंद घेऊन काम करतो”.