गेल्या महिन्याभरात ‘झी मराठी’ वाहिनीवर अनेक सकारात्मक बदल होऊन, सध्या वाहिनी चांगल्या टीआरपी आकडेवारीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महिन्याभरापूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांचं २५ वं वर्ष साजरं केलं. यादिवशी ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचं ग्रँड लाँचिंग करण्यात आलं. या पाठोपाठ ‘तुला जपणार आहे’ या मालिकेची लहानशी झलक सुद्धा या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या दोन मालिका अद्याप ऑन एअर झालेल्या नाहीत. अशातच वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘लक्ष्मी निवास’, ‘तुला जपणार आहे’ या मालिकांपाठोपाठ आता आणखी एक नवीन थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘इच्छाधारी नागीण’. (Ichchadhari Nagin serial Audience upset)
झी मराठी वाहिनीने नुकतीच ‘इच्छाधारी नागीण’ या आगामी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली. प्रोमोमधील पहिली झलक पाहूनच ही मालिका थ्रिलर असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. अद्याप याची तारीख, वेळ, कलाकार याची कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंधारी रात्र, खळखळ वाहणारं पाणी, त्यातून बाहेर येणारे दोन नाग ही दृश्य सर्वांचं लक्ष वेधून घेतात. या व्हीएफएक्सचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे, पण दुसरीकडे काहींनी मालिकेवर टीकाही केली आहे.
मालिकेच्या या नवीन प्रोमोखाली अनेकांनी “यापेक्षा जुन्या मलिका चालु करा, टीआरपी पण वाढेल”, “झी मराठीची पूर्ण वाट लावली आहे”, “झी मराठीने हे चॅनल न पाहण्याचे कारण दिले”, “नाही नको.. असलं काही नको झी मराठीवर”, “नाव ऐकूनच बघायची इच्छा गेली”, “झी मराठी कडून ही अशी अपेक्षा नव्हती” या आणि अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी वाहिनीने आधीच ज्या मालिकांची घोषणा केली आहे, त्या मालिका पुन्हा सुरु करण्याबाबत कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सध्या प्रत्येक मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ‘इच्छाधारी नागीण’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.