‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. अशातच ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील सार्थक व आनंदीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सार्थक व आनंदी यांच्यातील प्रेम फुलताना दिसत असून ही जोडी पुन्हा एकदा कुटुंबाच्यासमवेत विवाहबंधनात अडकणार असल्याचे पाहायला मालिकेत पाहायला मिळणार आहे. सार्थक आनंदी यांचा विवाह सोहळ्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अशातच या विवाहसोहळ्याला ‘स्टार प्रवाह’ परिवारातील इतर मालिकांच्या कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. (Jui Gadkari)
सध्या मालिकेत संगीत सोहळ्याचं चित्रीकरण सुरु असून यावेळी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली व अर्जुन यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मालिकेच्या शूटिंग दरम्यान सायली व अर्जुन यांनी ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यावेळी सायली व अर्जुनला ‘लग्नात जेवायला आवडतं? की जेवण वाढायला आवडेल?’, असा प्रश्न विचारला असता यावर सायलीने दिलेल्या उत्तराने साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
या प्रश्नाचं उत्तर देत सायली म्हणाली, “मला जेवायला आवडतं. लग्नात मला मसालेभात जेवायला आवडतं. लग्न जर पुण्यात असेल, आणि तेथील पारंपरिक मंगल कार्यात लग्न असेल तर तेथील पारंपरिक पदार्थ खायला खूप आवडतात. मला लग्नातील मसालेभात खूप आवडतो. पंगत उठून गेल्यावर मला एका पॉइंटला सांगायला आले की, मॅडम आता उठा. मला मसालेभात खूप आवडतो. लग्नाचं जेवण जेवायला जायचं असेल तर मी मुद्दाम उपवास वगैरे करुन जाऊ शकते. पिवळी बटाट्याची भाजी, पुरी, जिलेबी, मसालेभात हे पारंपरिक पदार्थ खूप आवडतात. आणि मुळात पंगतीत बसून जेवायला फार आवडतं”.
सायली व अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर आहे. मालिकेत आता सायली व अर्जुन यांच्यातील प्रेम बहरताना पाहायला मिळतंय. लवकरच अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. आनंदी व सार्थक प्रमाणे सायली व अर्जुन यांचाही पुन्हा शुभविवाह पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.