महाराष्ट्रात निवडणुकांचं वारं सुरु झालं असून अनेक जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. ११ राज्यातील लोकसभेच्या एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातही ११ जागांवर मतदान होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कलाकार विश्वातील अनेक मंडळीही आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि मतदानाचे आवाहन करत आहेत. अशातच अभिनेता रितेश विलासराव देशमुखनेदेखील कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
रितेशने पत्नी जिनिलीया व आईबरोबर मतदान केले असून मतदानानंतरचे काही फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मतदानानंतरचा फोटो शेअर करत “आम्ही मतदान केले आहे, तुम्ही केले का?” असं म्हटलं आहे. तर जिनिलीयानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्वत:साठी मतदान करा, भविष्यासाठी मतदान करा आणि तुमच्या देशासाठी मतदान करा’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर या दोघांनी फोटोद्वारे त्यांनी मतदानाचे आवाहनही केल आहे.
मतदानानंतर रितेश व जिनिलीया यांनी ‘ANI’सह बाकी माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली. यावेळी रितेशने असं म्हटलं की, “मी मतदान करण्यासाठी मुंबईहून लातूरला आलो आहे. प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने नक्कीच मतदान करावे” तर जिनिलीयानेही तिचं मत व्यक्त करत असं म्हटलं की, “हा एक महत्त्वाचा दिवस आहे आणि मला वाटते की आज प्रत्येकाने आपले मत दिले पाहिजे.”
आणखी वाचा – आयुष्मान योगामुळे मेष राशीसह ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, नोकरी-व्यवसायातही मिळेल यश, जाणून घ्या…
रितेशचे वडील महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरमधील बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु, वैयक्तिक आयुष्यात रितेशने वडिलांपेक्षा वेगळा मार्ग निवडत मनोरंजनसृष्टीत आपलं नशीब आजमावत आहे. पण रितेशचे दोन्ही भाऊ राजकारणात सक्रिय आहेत.
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर रितेश लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ या चित्रपटात झळकणार आहे. तर, अभिनेत्री जिनिलीया लवकरच आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
,