‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका छोट्या पडद्यावरील अजरामर मालिका ठरली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या मालिकेचे सगळ्याच वयोगटातील प्रेक्षक चाहते आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील प्रत्येक पात्रही प्रेक्षकांना जिव्हाळ्याचं वाटतं. मात्र मध्यंतरीच्या काळात ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली. मालिकेमधून काही कलाकारांनी एक्झिट घेतली. मात्र निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. पैसे वेळेवर मिळत नसल्याचंही काही कलाकारांनी उघडपणे सांगितलं. यावर निर्मात्यांनीही स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले. आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच जेठालाल, बबिता म्हणजेच दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. याबाबतच आता अधिकृत माहिती समोर आली आहे. (asit modi on jethalal babita ji exit)
गेल्या काही भागांमध्ये दिलीप आणि मुनमुन मालिकेमध्ये दिसले नाहीत. त्यानंतर दोघांनीही शो सोडला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. खरं तर जेठालाल हे पात्र मालिकेचा जीव आहे. त्यामुळे विविध चर्चा समोर येत असताना प्रेक्षक नाराज झाले होते. आता या सगळ्या चर्चांवर निर्माते असित मोदी यांनी भाष्य केलं आहे. दिलीप आणि मुनमुन यांनी नक्की शो सोडला का? याविषयी सांगितलं.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असित म्हणालेले की, “सोशल मीडियावर बऱ्याचदा नकारात्मकता दाखवली जाते. त्यामुळे आपण सकारात्मक विचार केला पाहिजे”. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बाबत कोणतीही चर्चा सुरु झाली तरी लोक त्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेबाबत नकारात्मक चर्चा होते असं असित यांचं म्हणणं आहे.
आणखी वाचा – ‘पारू’ मालिका बंद होणार?, नव्या मालिकांच्या वेळांना प्राधान्य दिल्याने प्रेक्षक संभ्रमात, नक्की काय होणार?
असित म्हणाले, “मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक अफवांवर जर मी उत्तर देत बसलो तर हे कधीच संपणार नाही. अलिकडेच दिलीप जोशी त्यांच्या काही खासगी कारणांमुळे मालिकेमध्ये दिसले नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की, त्यांनी शोच सोडून दिला. फक्त एकाच भूमिकेच्या आजूबाजूला मालिकेची कथा जोडली जाऊ शकत नाही. पण लोक काहीही तर्क वितर्क लावतात. मात्र मी फक्त मालिकेच्या कथेकडे लक्ष देतो. या सगळ्या अफवांकडे लक्ष देत नाही”.





