मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेता सुबोध भावेचं नाव आदराने घेतलं जातं. मालिका, चित्रपट, नाटक अशा प्रत्येक माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत सुबोधने आजवर प्रेक्षकांना आपलंस केलं. तो त्याच्या कामावर अगदी जीवापाड प्रेम करतो. कामाव्यतिरिक्त त्याचं व त्याची पत्नी मंजिरीचं नातंही समोरच्याला हेवा वाटेल असंच आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील आदर्श जोडप्यांपैकी सुबोध-मंजिरीचं जोडपं आहे. या दोघांचं नातं कसं फुलत गेलं? तसेच यांच्या नात्यामधील काही गंमती सुबोधने सांगितल्या आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमामध्ये सुबोध हजेरी लावणार आहे. त्याचपूर्वी या कार्यक्रमाचे काही प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात सुबोध त्याच्या कामाबरोबरच खासगी आयुष्याबाबतही भाष्य करताना दिसेल. तसेच प्रत्येक प्रश्नांना अगदी दिलखुलासपणे उत्तरं देताना दिसेल. दरम्यान अवधूत त्याला एक प्रश्न विचारतो. यावर सुबोधने दिलेलं उत्तर अगदी रंजक आहे.
“तू मंजिरीला रक्ताने पत्र लिहिलं होतं अशी चर्चा होती. तर हे खरं आहे का?” असा प्रश्न अवधूतने सुबोधला विचारला. यावर तो म्हणाला, “हो. गणपतीच्या नंतर मी व माझा मित्र सिंहगडला गेलो होतो. गडावरती नव्हतो. गडाच्या पायथ्याशी आम्ही गेलो होतो. मंजिरीही तिकडे येईल हे मला तेव्हा माहीत नव्हतं. तिथे मी सिगारेट ओढत होतो. सिगारेट ओढता ओढता एक मुलगी (मंजिरी) शेजारी आली”.
“तिच्याकडे मी पाहिलं आणि सिगारेट माझ्या हातातून खाली पडली. त्याच्यानंतर ती चिडून गेली आणि पुढचे काही दिवस माझ्याबरोबर बोललीही नाही. मी चुकलो असं म्हणत तिला खूप विणवण्या केल्या. तरीही ती काही बोलली नाही. मग तेव्हा मी कर्कटकने रक्त काढत पत्र लिहिलं. इतकंच नव्हे तर कर्कटकनेच हातावर एम कोरला होता. हे सगळं मी करुन झालो आहे”. हे सांगताना सुबोधसह अवधूतलाही हसू अनावर झालं.