सध्या सोशल मीडियावर कलाकार मंडळी अधिकाधिक सक्रिय असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे सक्षम माध्यम झालं आहे. तर कित्येक नवीन चेहरे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आले आणि चर्चेचा विषय ठरले. त्यातीलच एक चेहरा म्हणजे अंकिता वालावलकर. अंकिताला आता कोकण हार्टेड गर्ल नावाने ओळखलं जातं. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्येही ती दिसली होती. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. युट्युबद्वारे व्हिडीओ शेअर करत अंकिताने प्रवासादरम्यान तिला आलेल्या विचित्र अनुभवाबाबत भाष्य केलं.
अंकिताने यावेळी शेअर केलेला युट्युब व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. कोकणात जात असताना तिला एक विचित्र अनुभव आला. अंकिताला रस्त्यामध्ये चक्क चकवा लागला होता. मुंबई ते सिंधुदुर्ग असा प्रवास करत असताना तिला एका वेगळ्या घटनेचा सामना करावा लागला. अंकिता म्हणाली, “दरवेळी मी गगनबावडा घाटामधून जाते. पण यावेळी मात्र मी मॅपनुसार फोंडा घाटाच्या दिशेने गेले. गगनबावडा मॅपमध्ये दाखवत असतानाही आम्ही फोंडा घाटाच्या रस्त्याने गेलो. त्यादरम्यानेच मला चकवा लागला”.
आणखी वाचा – स्मृती इराणींनी मैत्रिणीच्याच पतीशी केलं लग्न?, बऱ्याच वर्षांनी सांगितलं सत्य, म्हणाल्या, “माझा अपमान…”
पण हे सगळं सुरु असताना तिला आणखी एक विचित्र दृश्य दिसलं. गाडीमधून तिला काहीतरी जळताना दिसलं. तर तिकडे माणसं असतील या हेतूने त्यादिशेने ती गाडी घेऊन गेली. पण तिथे तिने पाहिलं तर ती स्मशानभूमी होती आणि तिथे एक प्रेत जळत होतं. शिवाय अंकिता परत परत त्याच रस्त्यावर येत होती. तिच्यासाठी हा संपूर्ण प्रकार भयावह होता.
अंकिता तिच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. फक्त आजवर ऐकू आलेल्या या गोष्टी आज प्रत्यक्षात अनुभवल्याचं तिने सांगितलं. शिवाय व्हिडीओच्या सुरुवातील माझा या गोष्टींवर विश्वास नसल्याचं अंकिताने म्हटलं. पण प्रत्यक्षात अनुभव आल्यानंतर मात्र ती घाबरली. अंकिताने व्हिडीओ शेअर करताच तू तुझी काळजी घे असं तिचे चाहते तिला म्हणत आहेत.