स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी दिलेला स्वातंत्र्य लढा व त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आध्याय सांगणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणदीप हुड्डाने या चित्रपटात वीर सावरकर यांची भूमिका केली असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटाची व रणदीपची चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. गेल्या शुक्रवारी हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आज मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होत असून या चित्रपटात रणदीप हुडाच्या भूमिकेला सुबोधने आवाज दिला आहे आणि याचनिमित्ताने सुबोधने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सुबोध भावेने या चित्रपटाविषयी असं म्हटलं आहे की, “आजपासून सर्वत्र ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट मराठीमध्ये प्रदर्शित होत आहे. आदरणीय सुधीर फडके यांची निर्मिती असलेल्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटात मी एका ब्रिटिश पोलिस ऑफिसरची छोटीशी भुमिका केली होती आणि आज रणदीप हुडा अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या सावरकरांच्या भूमिकेला मराठीमध्ये आवाज देण्याची संधी मला मिळाली.”
यापुढे सुबोधने “केवळ विनायक दामोदर सावरकर नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केलेल्या असीम त्यागाची व प्रखर देशभक्त असलेल्या सावरकरांची ही कहाणी आहे. या चित्रपटात रणदीप हुडा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहेत. त्यामुळे त्यांच्या जिद्दीला व मेहनतीला एक अभिनेता म्हणुन माझा मनापासून सलाम” असं म्हणत प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटात वीर सावरकर यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. या चित्रपटासाठीसाठी रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली आहे. त्याने हिंदी व मराठी दोन भाषेत चित्रपटाची निर्मिती केली आहे.