आपल्या ठसकेबाज आवाजामुळे अगदी लहान वयातच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मन जिंकणारी गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. ‘सारेगमप लिट्ल चॅम्पस’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून कार्तिकीने मराठी रसिक श्रोत्यांची मनं जिंकली. काही वर्षांपूर्वी गायिका रोनित पिसेबरोबर विवाहबंधनात अडकली. ‘सारेगमप लिट्ल चॅम्पस’ची विजेती व गाण्याचे कार्यक्रम करणारी कार्तिकी आता तिच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.
लग्नाच्या ४ वर्षांनंतर गायिका कार्तिकी गायकवाडने आई होणार असल्याची खुशखबर दिली आहे. नुकताच तिच्या डोहाळजेवणाचा कार्यकर्म पार पडला असून या खास कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तर तिचा पती रोनित पिसेने पांढऱ्या रंगाचा पठाणी कुर्ता परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओखाली कार्तिकीच्या अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच कमेंट्सद्वारे गायिकेला तिच्या अनेक चाहत्यांनी अभिनंदनही म्हटले आहे. दरम्यान, ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली असताना तिने विविध बाजाची गाणी म्हटली होती. पण अभंग, गवळणी गाताना तिचा आवाज अधिकच खुलायचा. त्यानंतर ‘गजर किर्तनाचा’ या कार्यक्रमामध्ये ती निवेदिका म्हणूनही समोर आली आहे. अशातच ती आता तिच्या आयुष्यातील एका नवीन भूमिकेद्वारे सर्वांसमोर येत आहे.
कार्तिकीने डिसेंबर २०२० साली व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आणि सगळ्यांना सुखद धक्काच दिला. कार्तिकी व रोनित यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार्तिकीचा नवरा रोनित पिसे हा पेशाने व्यावसायिक आहे. तो पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे.