कुठलाही कलाकार हा नेहमीच त्याच्या कामाच्या कौतुकाचा भुकेला असतो. एखाद्या कलाकाराला चाहत्याने वा प्रेक्षकाने केलेले कौतुक हे नेहमीच आवडत असतं आणि प्रत्येक कलाकाराला चाहत्यांच्या कौतुकाचे अनुभव हे पदोपदी येत असतात. असाच एक खास अनुभव अभिनेत्री शिवानी रांगोळेला आला असून तिने हा अनुभव नुकताच ‘इट्स मज्जा’च्या प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे.
‘झी नाट्य गौरव’च्या निमित्ताने ‘इट्स मज्जा’ने शिवानीबरोबर खास संवाद साधला. यावेळी तिला तिच्या आठवणीतील एक कौतुकाची थाप विचारण्यात आली. यावेळी एका शिवानीने कौतुकाचा किस्सा सांगत असं म्हणाली की, “काही वर्षांआधी मी ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत रमाई आंबडेकर यांची भूमिका साकारली होती. तेव्हा खूप लांबून, मला वाटतं धुळ्याहून आम्हाला भेटायला एक कुटुंब आले होते आणि ते बराच वेळ लांब उभे राहून मला बघत होते. माझ्याशी काहीही बोलत नव्हते. पण फक्त मला बघतच होते. मला वाटतं ते खूप घाबरत होते. त्यांना असं उभं राहिलेलं बघून मीच त्यांना विचारलं की, “तुम्हाला काही बोलायचं आहे का?, तुम्ही कुठून आला आहात.”
आणखी वाचा – हार्दिक जोशीने खरेदी केली नवीकोरी महागडी कार, वडिलांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू दिली अन्…; फोटो व्हायरल
शिवानीने त्यांना हे विचारताच ते अचानक रडू लागले असं ती म्हणाली. त्यांना खूप भरून आलं होतं आणि मग त्यांनी मला असं म्हटलं की, “आम्ही रमाबाईंना तुमच्यातच पाहतो. कारण आम्ही आतापर्यंत रमाबाईंविषयी वाचलं होतं. त्या प्रत्यक्षात कशा असतील हे कधीच बघितलं नव्हतं. मग त्यांनी अचानक माझे पाय धरले आणि चांगल्या अर्थाने हा प्रसंग माझ्या अंगावर येणारा होता. तर माझ्यासाठी ही खूप मोठी कौतुकाची थाप होती.”
दरम्यान, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत शिवानीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीची अर्थात रमाबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची ही भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशातच सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.