‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आणि यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात यशस्वी आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर प्रेक्षकांना हसवणारे सिद्धार्थ हे अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. ८ मार्च २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
१९९९ साली सिद्धार्थ दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रियाबरोबर लग्नबंधनात अडकले. अशातच या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने सध्याच्या नातेसंबंधावर भाष्य केलं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “एखादं नातं तोडणे ही खूपच सहज शक्य असते. अशातच घटस्फोट होणे ही खूपच वाईट गोष्ट आहे. आमचं नातंही घटस्फोटापर्यंत गेलं होतं. मी याआधी हे कुठेही बोललेले नाही. पण सिद्धार्थ व माझ्यात घटस्फोटावरून नेहमीच चर्चा होत असे. तेव्हा तो मला म्हणायचा की तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस. त्यामुळे तुला जे वाटतं ते तू कर.”
यापुढे ती असं म्हणाली की, “घटस्फोटावरुन आमच्यात अनेक चर्चा व्हायच्या. तेव्हा आपल्यात घटस्फोट झाला, तरीदेखील आपण चांगले मित्र म्हणूनच राहू असा विचार आम्ही करायचो. घटस्फोटानंतरही चांगले मित्र म्हणून राहता येतं आणि हेच मी माझ्या मुलांनादेखील सांगते की, एखादे नाते तोडणे हे खूपच सोपे असते. पण एखादे नाते निर्माण करणे हे तितकेच अवघड असते.”
दरम्यान, ‘फुल और अंगार’, ‘मेहेरबान’, ‘मेरा सजना साथ निभाना’, ‘वीरता’, ‘अंधा इतंकाम’, ‘हॅमिल्टन पॅलेस’, ‘सौगंध’, ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती यासारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर शांतीप्रियाने काम केले आहे.