काही दिवसांपूर्वीच दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचे ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच रवींद्र महाजनी यांचे अनपेक्षित निधन झाले. मात्र त्यांच्या निधनापूर्वीच माधवी यांनी हे पुस्तक लिहून पूर्ण केले होते. यात माधवी यांनी रवींद्र यांच्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. रवींद्र हे माधवी यांच्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत असल्याचाही धक्कादायक खुलासा केला आहे. माधवी यांनी हा प्रसंग सांगण्याआधी संदर्भ म्हणून एक घटना सांगितली आहे.
पुण्याजवळील एक वादग्रस्त जमीन विकण्यासाठी रवींद्र महाजनींचा एक मित्र त्यांच्या मागे लागला होता. रवींद्र महाजनींची एका इन्कम टॅक्स कमिशनरची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या या ओळखीचा फायदा घेऊन ही वादग्रस्त जमीन विकली जावी, यासाठी त्यांचा तो मित्र रवींद्र यांच्या मागे लागला होता. पण रवींद्र यांनी यात पडू नये असं माधवी यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी बेकायदेशीर गोष्टींत रवींद्र यांना न पडण्याचा सल्ला दिला आणि रवींद्र यांनी पत्नीचा हा सल्ला ऐकलादेखील. पण हा व्यवहार न झाल्यामुळे रवींद्र यांचा तो मित्र माधवी यांच्यावर नाराज झाला आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठी तो माधवी यांच्याविरुद्ध रवींद्र यांचे कान भरू लागला.
या मित्रामुळे रवींद्र महाजनी पत्नीवर संशय घेऊन त्यांना माराहण करत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. याबद्दल माधवी यांनी या पुस्तकात असं म्हटलं आहे की, “अलीकडे रवी कोल्हापूरच्या त्याच्या चाहत्याबद्दल संशय घेऊन मला मारू लागला होता. खरंतर हा माणूस तसा स्वभावानं चांगला होता. तो उलट रवीला सांगत असे की, “तू वहिनींच्या चारित्र्याबद्दल संशय घेणं बरोबर नाही. मी तर किती वर्षांपासून वहिनींना ओळखतो. तू त्यांच्याशी नीट वाग.’ पण झालं उलटंच. जो लबाड होता, तोच रवीला चांगला वाटत होता आणि जो रवीचा हितचिंतक होता त्याच्याबद्दल रवीनं गैरसमज करून घेतला होता.”
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पुन्हा तो मित्र व रवी दोघे त्या तथाकथित ज्योतिषाकडे गेले. त्याने पत्रिका पाहिल्यावर माझी निंदा करायला सुरुवात केली. “ही तुमच्याशी एकनिष्ठ नाही. हिचं तुमच्या मित्राशी अफेअर आहे. ही तुमच्या पाठीत खंजीर खुपसतेय वगैरे वगैरे…” मला पुष्कळ नावंही ठेवली. रवींद्रचा स्वभाव आधीच संशयी बनला होता. त्यात या गोष्टीमुळं भरच पडली. ज्योतिषानं रवीच्या त्या चांगल्या मित्राचं नाव माझ्याशी जोडून ह्या दोघांचे संबंध असल्याचं त्याला सांगितलं. रवींद्रच्या त्या मित्रानं त्या ज्योतिषाला आधीच सांगून ठेवलं होतं. नंतर असंही कळलं की, ते दोघे बांधकाम व्यवसायात पार्टनर होते. याचा अर्थ मी रवीला जागेबाबत जो सल्ला दिला, त्यामुळे त्या मित्राचं आर्थिक नुक्सान झालं होतं आणि त्याचा तो अशा तन्हेनं सूड घेऊ पहात होता. दुर्दैवानं त्याला तशी संधीही मिळाली. रवीचा माझ्यावरचा विश्वास उडला होता. त्यामुळे तो सहज त्याच्या डावाला बळी पडला.”