ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी त्यांच्या सशक्त अभिनयाने ४० वर्षे मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. ‘मोरुची मावशी’ या नाटकात विजय चव्हाण यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यांत गाजलेले नाटक. १ जानेवारी १९८५ रोजी रंगमंचावर पहिल्यांदा सादर झालेल्या या नाटकाने त्यानंतर जवळपास अडीच हजार प्रयोगांचा पल्ला गाठला.
विजय चव्हाण यांचं ‘मोरुची मावशी’ हे नाटक म्हणजे तर रसिकांसाठी हास्याची मेजवानी होती. आजही ‘मोरूची मावशी’ म्हटलं की, विजय चव्हाण यांचंच नाव अग्रक्रमाने येतं. ‘मोरूची मावशी’ हे संपूर्ण नाटक विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देणारं आहे. ‘मोरुची मावशी’ म्हणजे विजय चव्हाण आणि विजय चव्हाण म्हणजे ‘मोरुची मावशी’ हे समीकरण जणू ठरलेलंचं. पण इतक्या लोकप्रिय व प्रसिद्ध नाटकासाठी विजय चव्हाण यांना एकही पारितोषिक मिळाला नाही.
‘मोरुची मावशी’ या नाटकाचे एकूण अडीच हजार प्रयोग पार पाडले. पण यातील ‘मोरुची मावशी’ला म्हणजेच अभिनेते विंजय चव्हाण यांना या नाटकासाठी एकही पारितोषिक मिळाला नसल्याची खंत त्यांचा मुलगा व अभिनेता वरद चव्हाणने व्यक्त केली आहे. नुकत्याच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात वरदने या विषयीचे खंत व्यक्त केली आहे.
या मुलाखतीत त्यांनी खंत व्यक्त करत असं म्हटलं की, “मोरुची मावशी’सारख्या नाटकाचे २५ हजार प्रयोग झाले. पण इतकं हिट नाटक देऊनही त्या नाटकासाठी बाबांना (विजय चव्हाण) एकही पारितोषिक मिळालं नाही. त्याचबरोबर ‘दामोदर पंत’ या नाटकासाठीदेखील त्यांना एकही पारितोषिक मिळालं नव्हतं. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे.”
दरम्यान, ८ जानेवारी रोजी वरद व विजय चव्हाण यांचा दोघांचा वाढदिवस असतो. याचे औचित्य साधत वरदने ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. यावेळी वरदने विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्याचा इंडस्ट्रीतील संघर्ष आणि त्याच्या अनुभवाचे कथनही केले.