मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराने अशोक सराफ यांचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. कायमच चतुरस्त्र अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. विनोदी, गंभीर अशी कुठलीही भूमिका असं त्यांनी कायमच अभिनयाची बॅटिंग केली. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. (Ashok Saraf Emotional Incident)
इतक्या वर्षांच्या निखळ कामाची पोचपावती म्हणून खुद्द महाराष्ट्र सरकारने अशोक सराफ यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांच्या नावे केला. लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे हे लाडके व्यक्तिमत्त्व एका भीषण अपघातातून बचावले होते. हा अपघात एक पुर्नजन्मच होता, मात्र या अपघातादरम्यान एक नकोशी अशी आठवण कायमच अशोक सराफ यांना भेडसावत राहिली. ही नकोशी असलेली आठवण त्यांनी ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात सांगितली आहे. १९८७ साली अशोक सराफ यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता त्यामुळे मी या अपघातातून सुखरूप बचवलो असं नाही तर हा माझा पुनर्जन्मच झाला आहे असं ते या घटनेबाबत ‘मी बहुरूपी’ या त्यांच्या पुस्तकात बोलले आहेत. यावेळी त्यांनी यादरम्यान घेतलेली एक नकोशी आठवणही सांगितली.
अशोक सराफ यांनी सांगितलं की, “या काळातली एक आठवण मात्र नकोशी आहे. आई आजारी होती म्हणून तिला माझ्या अपघाताविषयी काहीच सांगितलेलं नव्हतं. अशोक कुठे आहे असं विचारल्यावर शूटिंग करतोय असं उत्तर तिला दिलं जायचं. ९ मे १९८७ या दिवशी आई गेली. मी पुण्यातच हॉस्पिटलमध्ये होतो. मला आईला भेटताही आलं नाही. तिच्या त्या शेवटच्या काळात मी तिच्याबरोबर असायला हवं होतं. तिलाही माझी आठवण येत असणार. मला बघावंसं वाटत असणार” असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले आहेत की, “शूटिंग असलं तरी अशोक भेटायलाही येत नाही म्हणजे काहीतरी बिघडलंय असं वाटलं असेल का तिला? तिला काही जाणवलं असावं का? मी हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून, नाहीतर आईचं जाणं मी कसं सहन करू शकलो असतो? माझ्यावरची आपत्ती आईने आपल्या अंगावर घेतली असा माझा विश्वास आहे” असंही ते म्हणाले.