‘हिंदी बिग बॉस’ म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा चेहरा उभा राहतो. २ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थ वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्याचं निधन झालं. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा दुःखद धक्का सहन करावा लागला. आता या घटनेला दोन वर्ष उलटून गेली आहेत. सिद्धार्थची सगळ्यात जवळची मैत्रीण शहनाज गिल तर पूर्णपणे कोलमडून गेली होती. पण सिद्धार्थच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं होतं? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सिद्धार्थ त्याच्या नेहमीच्या सवयींप्रमाणे १ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री झोपला. पण मध्यरात्री अचानक त्याला छातीमध्ये दुखू लागलं. दरम्यान त्रास होत असताना तो थंड पाणी पिऊन पुन्हा झोपला. पण मध्यरात्रीच त्याचा त्रास अधिक वाढत गेला. २ सप्टेंबरला सकाळी त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. छातीत दुखत असल्यामुळे पुन्हा थंड पाणी पित असताना तो बेशुद्ध झाला.
त्यावेळी सिद्धार्थची झालेली अवस्था पाहून डॉक्टरांना बोलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी लगेचच त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये भरती करण्याचा सल्ला दिला. त्याला कुपर रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं. पण रुग्णालयामध्ये पोहोचताच डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केलं होतं. सिद्धार्थच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण कलाविश्वालाच मोठा धक्का बसला होता.
सिद्धार्थ त्याच्या आईसह मुंबईमध्ये राहत होता. त्याच्या आईसाठी हा संपूर्ण काळ अधिक कठीण होता. आईच्याच म्हणण्यानुसार त्याने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. २००८मध्ये तुर्कीमधील नावाजलेल्या मॉडलिंग शोमध्ये सिद्धार्थने सहभाग घेतला होता. या शोचा तो उपविजेता ठरला. त्यानंतरच त्याने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं होतं. त्याचा संपूर्ण प्रवास कायम आठवणींमध्ये राहणारा ठरला.