Mitali Mayekar On Mother In Law Wedding : मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कामाबरोबरच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत राहिला आहे. सिद्धार्थ व मिताली मयेकर या जोडीला तर त्यांचे चाहते भरभरुन प्रेम देतात. आता सिद्धार्थने खास पोस्ट शेअर करत सगळ्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. सिद्धार्थची आई दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे.
सिद्धार्थने आईच्या लग्नाचे फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये आईचं लग्न मी लावून दिलं असल्याचं त्याने म्हटलं. सिद्धार्थच्या या निर्णयाचं सगळेचजण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. आता सिद्धार्थ पाठोपाठ मितालीनेही सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिचा आनंद व्यक्त केला.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली सिद्धार्थ चांदेकरची आई, अभिनेता म्हणतो, “आता मी तुझं लग्न लावतोय कारण…”
मिताली म्हणाली, “सासूबाई सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा. माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटतो तुझा की, हा एवढा मोठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास”. मितालीने सासूबाईंचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं.
पुढे मिताली म्हणाली, “मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की, तोसुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा मला अभिमान वाटतो. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्याबरोबर आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम”. मितालीने शेअर केलेल्या या पोस्टचं सगळेच जण अगदी कौतुक करत आहे. तसेच सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.